हुपरीवर अखेर प्रशासक नियुक्ती

By Admin | Published: April 12, 2017 01:21 AM2017-04-12T01:21:53+5:302017-04-12T01:21:53+5:30

ग्रामपंचायत केली बरखास्त : नगरपालिका स्थापन करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात

Appointment of Administrator at Hapur | हुपरीवर अखेर प्रशासक नियुक्ती

हुपरीवर अखेर प्रशासक नियुक्ती

googlenewsNext

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपालिका स्थापन होण्याचे रौप्यनगरीवासीयांचे गेल्या ४५ वर्षांपासूनचे असणारे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका उभारणीच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात केली. तहसीलदार वैशाली राजमाने यांनी मंगळवारी रात्री प्रभारी सरपंच भारती बावचे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.
हुपरी शहराची लोकसंख्या सुमारे ५० हजारांहून अधिक झाली आहे. शहराचा विस्तार मोठ्याप्रमाणात वाढल्याने नागरिकांना सर्वप्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले होते. परिणामी नागरी विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाली असतानाही सर्वच राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नगरपालिका करण्याचे वारंवार केवळ आश्वासन देऊन रौप्यनगरीवासीयांची बोळवण चालविली होती. परिणामी सर्वच वृत्तपत्रांचे पत्रकार, सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, तरुण मंडळे, तालीम संघटना व नागरिकांच्या बळावर नगरपालिका कृती समितीची उभारणी करून, गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारच्या आंदोलनांबरोबरच राज्य शासनाकडे या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाला अखेर ३० जुलै २०१५ रोजी हुपरी येथे नगरपालिका स्थापन करण्याबाबतचा पहिला अध्यादेश काढावा लागला. त्यानंतरही कृती समितीने या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांनी निवडणुका संपताच या ठिकाणी नगरपालिकेची निश्चितपणे उभारणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे रौप्यनगरीवासीयांनी भाजप उमेदवारांच्या पदरात मोठ्याप्रमाणात मते टाकून विजयी केले आहे. याबाबतची जाणीव जनता समूहाचे संस्थापक आण्णासाहेब शेंडुरे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांना वेळोवेळी करून देऊन त्याबाबतचा पाठपुरावाही सुरू ठेवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. ६) हुपरी येथे नगरपालिकेची स्थापना करण्याचा अंतिम अध्यादेश काढला.
यावेळी दौलतराव पाटील, बाळासाहेब रणदिवे, किरण कांबळे, राजेंद्र सुतार, सचिन गाठ, संभाजी हांडे, धर्मा कांबळे, जयकुमार माळगे, सुदर्शन खाडे, सयाजीराव पाटील, बाबासाहेब गायकवाड, सर्जेराव हांडे, तसेच कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, बाळासाहेब कांबळे, तानाजी घोरपडे, आदी उपस्थित होते.


प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू : राजमाने
यावेळी प्रशासक व तहसीलदार वैशाली राजमाने म्हणाल्या, या शासन निर्णयाने रौप्यनगरीवासीयांचे गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका व्हावी असे स्वप्न सत्यात उतरत आहे. जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी येथे लवकरात लवकर नगरपालिकेची उभारणी होण्यासाठी अगदी तत्परतेने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू. तसेच नगरपालिका मंजुरीसाठी स्थानिक पत्रकारांनी उभारलेला लढा व घेतलेले परिश्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.

Web Title: Appointment of Administrator at Hapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.