रुग्ण समन्वयासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:17 PM2021-04-23T13:17:22+5:302021-04-23T13:19:08+5:30
CoronaVirus Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणू संबंधित रुग्णालयातील कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि या रुग्णालयांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चार स्वतंत्र अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी बुधवारी हा आदेश काढला.
कोल्हापूर- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संबंधित रुग्णालयातील कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि या रुग्णालयांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चार स्वतंत्र अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी बुधवारी हा आदेश काढला.
या आदेशानुसार सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे हे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे समन्वय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रत्येक अधिकाऱ्याकडे पाच संगणकचालकही देण्यात आले आहेत.
नेमून दिलेली कामे
१) रुग्णालयातील अतिदक्षता विभाग व कोरोना वॉर्ड रुग्णांसाठी खाटा उपलब्धतेच्या नोंदी घेणे.
२) कोविड रुग्णव्यवस्थापन संगणक प्रणाली आस्थापित करून प्रत्येक रुग्णाची संगणक प्रणालीमध्ये आवक, जावक नोंदी घेणे.
३) रुग्णालयातील सुरक्षेसाठी नियुक्त यंत्रणा, रुग्णांना जेवण पुरवणारी यंत्रणा, स्वच्छता व निर्जंतुकीकरण यंत्रणा, वाहतूकव्यवस्था, मदत कक्ष इ. बाबत समन्वय अधिकाऱ्यांना मदत करणे.
४) प्रत्येक वॉर्डातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण व्यवस्थापन, रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सोयी-सुविधा, नोंदणी, डिस्चार्ज याच्या नोंदी ठेवणे.
५) गंभीर व अतिगंभीर रुग्णांची संबंधित स्टाफकडून रोज तपासणी होते का आणि नोंदी घेतल्या जातात का, याची खात्री करणे.
६) दैनंदिन येणाऱ्या रुग्णांच्या नोंदींबाबत खात्री करणे.
७) संबंधित रुग्णालयांकडून प्रयोगाशाळांकडे रुग्णांचे घेण्यात आलेले नमुने वेळेवर व अचूक पोहोचतील याबाबत व्यवस्था करण्यात आली आहे, याची खात्री करणे.
८) रुग्णांचे नमुने घेताना विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये रुग्णाचे नाव, पत्ता, तसेच संपर्क क्रमांक अचूकपणे भरण्यात येत आहे का, याची खात्री करणे.
९) जनतेसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला असून, तो २४ तास सुरू राहील याची खातरजमा करणे.