बाजार समितीचा कागदोपत्री ताबा पोलीस बंदोबस्तात पदभार : प
By admin | Published: November 18, 2014 12:00 AM2014-11-18T00:00:53+5:302014-11-18T00:08:47+5:30
प्रशासककांना मात्र खुर्ची देण्यास विरोध
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजारसमितीचे प्रशासक रंजन लाखे यांना आज, सोमवारी करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी पोलीस बंदोबस्तात कागदोपत्री पदभार दिला; पण प्रत्यक्ष ताबा देण्यास अशासकीय मंडळाचे अध्यक्ष आर. के. पोवार यांनी विरोध केल्याने गुंता कायम राहिला आहे. दोनवेळा पदभार देण्यास अशासकीय मंडळाने अटकाव केल्याने रंजन लाखे आज सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त व महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पदभार स्वीकारण्यासाठी समितीत आले. त्यांना दारातच सदस्यांनी रोखल्याने लाखे व सदस्य यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली. त्यानंतर जादा पोलीस बंदोबस्तासह सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव समितीत दाखल झाल्या. त्यांनी सदस्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयीन आदेश व जिल्हा उपनिबंधकांचे आदेश यावर दोन्ही बाजू ठाम राहिल्याने पेच सुटला नाही. अखेर तहसीलदार खरमाटे आले आणि त्यांनी थेट समिती कार्यालयात प्रवेश केला. अध्यक्ष आर. के. पोवार यांच्या केबिनमध्ये बसून त्यांनी सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी खरमाटे, लाखे व पोवार यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपण कामकाज करीत असल्याने खुर्ची सोडणार नसल्याचे पोवार यांनी सांगितले. तहसीलदार खरमाटे यांना विचारले असता, आम्ही पंचनामा करून प्रशासक लाखे यांच्याकडे रितसर पदभार दिला असल्याचे सांगितले; पण या चर्चा अर्धवट ठेवून तहसीलदार गेले मग पदभार कोणाकडून घेतला, असा प्रश्न आर. के. पोवार यांनी केल्याने पदभार कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट झाले. समितीच्या अब्रूची लक्तरे वेशीवर बाजार समितीच्या इतिहास तिसऱ्यांदा प्रशासक आले; पण पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्तात व एवढ्या तणावाचे वातावरण झाले. त्यामुळे समितीच्या उरल्या-सुरल्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम अशासकीय व प्रशासक मंडळाने केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची गरज गेले पंधरा दिवस बाजार समितीत शासकीय की अशासकीय मंडळ यावरून वाद सुरू आहे. अशासकीय मंडळ पदभार सोडण्यास तयार नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने येथे जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून थेट निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. कर्मचारी सक्तीच्या रजेवर ! प्रशासक पदभार देता येऊ नये, यासाठी अशासकीय मंडळाने गेले तीन दिवस प्रशासकीय कार्यालयातील बहुतांशी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांतही संभ्रम आहे. अशासकीय मंडळ आज पदभार देणार? जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाविरोधात अशासकीय मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज यावर सुनावणी होऊन आदेशाला स्थागिती मिळेल, यासाठीच अशासकीय मंडळाने आज पदभार दिला नाही. पण येथे सकारात्मक निर्णय अपेक्षित नसल्याचे लक्षात आले आहे. पदभार नाही दिला तर प्रशासक कायदेशीर कारवाई करतील. त्यामुळे उद्या सकाळी अशासकीय मंडळ पदभार देण्याची शक्यता आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या पत्रानुसार आज रितसर प्रशासक रंजन लाखे यांच्याकडे पदभार दिलेला आहे. अशासकीय मंडळाकडून त्यांनी आधीच कार्यभार काढून घेऊन बँकांना कळविल्याने उद्यापासून लाखे कामकाज पाहतील. - योगेश खरमाटे तहसीलदार, करवीर तालुका दंडाधिकाऱ्यांनी महसूल व पोलीस यंत्रणेच्या साक्षीने पदभार दिलेला आहे. उद्या सकाळी अकरा वाजता समितीत येणार आहे. पदभार दिला, तर ठीक अन्यथा पोलीस यंत्रणेमार्फत हस्तक्षेप करावा लागेल. - रंजन लाखे प्रशासक, बाजार समिती लाखे यांनी पदभार दिलेला नाही. तहसीलदार, पोलीस अधिकारी व लाखे यांनी स्वतंत्र चर्चा केली आणि तेथून निघून गेले. न्यायालयाने आदेश दिला, तर दुसऱ्या सेकंदात पदभार सोडतो. - आर. के. पोवार अध्यक्ष, अशासकीय मंडळ