दोशी हायस्कूलमध्ये १५ दिवसांत विज्ञान शिक्षकाची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:48+5:302021-07-17T04:19:48+5:30
गांधीनगर : वळीवडे (ता. करवीर) येथील डॉ. कु. मालती मो. दोशी हायस्कूलमध्ये येत्या १५ दिवसांत विज्ञान विषयाच्या ...
गांधीनगर : वळीवडे (ता. करवीर) येथील डॉ. कु. मालती मो. दोशी हायस्कूलमध्ये येत्या १५ दिवसांत विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नेमणूक केली जाईल असे आश्वासन आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांनी दिले. त्यांच्या या आश्वासनानंतर राजगोंडा वळीवडे व चंद्रकांत पाटील यांनी जि.प. मधील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण स्थगित केले. वळीवडे येथील डॉ. कु. मालती दोशी हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकविणारे शिक्षक ऑगस्ट 2019 पासून नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वेळोवेळी विज्ञान शिक्षकाची नेमणूक करण्याची मागणी करूनही संस्थेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या कारणामुळे वळीवडे शाळा समितीचे चेअरमन राजगोंडा वळीवडे व शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले होते. उपोषणस्थळी आ. ऋतुराज पाटील व आ. प्रा. जयंत आसगावकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांनी भेट देऊन येत्या पंधरा दिवसांत शाळेला विज्ञान शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सुरू असणारे बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आल्याचे राजगोंडा वळीवडे व चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी शशिकांत खोत, अमोल चौगुले, अविनाश पाटील, वैजनाथ गुरव, जहांगीर नदाफ, रावसाहेब चव्हाण, गांधीनगर गुड्स मोटर मालक संघाचे पदाधिकारी शिवसेनेचे राजू यादव, पोपट दांगट, प्रसाद सलगर आदी उपस्थित होते.
फोटो : १६ वळीवडे उपोषण
वळीवडेतील डॉ. कु. मालती मो. दोशी हायस्कूलमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात सुरू असलेले उपोषण आ. ऋतुराज पाटील व आ. प्रा. जयंत आसगावकर व शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. यावेळी राजगोंडा वळीवडे चंद्रकांत पाटील, राजू यादव, पोपट दांगट आदी उपस्थित होते.