महिला पोलीस अधिकारी नियुक्तीस हरताळ
By admin | Published: May 29, 2017 12:33 AM2017-05-29T00:33:42+5:302017-05-29T00:33:42+5:30
महिला पोलीस अधिकारी नियुक्तीस हरताळ
दीपक जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे द्या, असे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचे आदेश कागदावरच आहेत. राज्यात महत्त्वाच्या पदांवर महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती झाली असताना कोल्हापूर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. सक्षम व कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची खंत जिल्ह्यातील वरिष्ठ महिला अधिकारी याच्यात आहे.
सध्या मुंबईबरोबरच राज्यात वरिष्ठ पदांवर महिला पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती वेगळीआहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ३० पोलीस ठाणी असून, यापैकी कळे पोलीस ठाण्यात फक्त महिला पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांचीही येत्या काही दिवसांत बदली होणार आहे.
मीना जगताप सोडल्या तर इतर अधिकारी पोलीस ठाण्याच्या प्रमुख नसल्या तरी विद्या जाधव या महिला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध शाखेचा कार्यभार काही दिवसांपासून सांभाळत आहेत. त्यांच्याकडे कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गचा कार्यभार येतो. याठिकाणी यशस्वीपणे काम पाहिलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील याची नियंत्रक कक्षात बदली केली आहे. त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्याने जिल्ह्याबाहेर बदली होण्याची शक्यता आहे. आरती नांद्रेकर या महिला कक्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्थापन केलेल्या निर्भया पथकाचे काम सक्षमपणे पाहत आहेत. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘पोलीस महासंचालकांच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार कळे, एमआयडीसी शिरोली या पोलीस ठाण्यांत जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. याबाबत आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा विषय ठेऊन निर्णय घेऊ.
जिल्ह्यात ११ अधिकारी
जिल्ह्यात सध्या एकूण ११ महिला अधिकारी आहेत. त्यात पाच वरिष्ठ अधिकारी आहेत; परंतु त्यांची ज्येष्ठता त्यांच्या नियुक्तींना अडथळा बनल्या आहेत. आर. जी. नदाफ, वैष्णवी पाटील, पुष्पलता मंडले, मीना जगताप, स्मिता काळभोर, आरती नाद्रेकर यांच्यासह ११ सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.