एमपीएससीच्या चार सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:28+5:302021-03-17T04:23:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील प्रशासन कोणाच्या हाती द्यायचे याची निवड करणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या चार सदस्यांची पदे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यातील प्रशासन कोणाच्या हाती द्यायचे याची निवड करणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या चार सदस्यांची पदे रिक्त आहेत. या पदासाठी छाननी करून काहींची नावेही निश्चित करण्यात आली. अंतिम मंजुरीसाठी अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. मात्र, निवड केल्यानंतर त्याला राज्यपाल मान्यता देतील का, या मुद्द्यावरून सदस्यांची निवड रखडल्याची माहिती पुढे येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही संविधानिक संस्था असून, आयोगाच्या अध्यक्ष व अन्य सदस्य हे राज्यपालांकडून नियुक्त केले जातील, अशी तरतूद आहे. राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवा व तत्सम सेवेसाठी सुयोग्य उमेदवाराची पारदर्शक पद्धतीने निवड करून त्याची राज्य शासनास शिफारस करण्याचे मुख्य काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केले जाते. प्रशासनात सुयोग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी लोकसेवा आयोगातील अध्यक्ष व सदस्य या पदावरील व्यक्तीदेखील अनुभव संपन्न, निर्विवाद सचोटी, चारित्र्यसंपन्न व उच्च विद्याविभूषित असणे आवश्यक असते. आयोगामधील चार सदस्य निवृत्त झाले असून, सध्या अध्यक्षपदी सतीश गवई व सदस्य म्हणून दयानंद मेश्राम हे दोनच सदस्य आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगात २०१८पासून चार सदस्यांची पदे रिक्तच आहेत. त्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून छाननीनंतर ५० ते ६० जणांची नावे निश्चित करून अर्ज अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविले होते. त्यानुसार कोणता सदस्य नियुक्त करायचा, हा प्रश्न निकाली काढण्यात आला. मात्र, सदस्यांची निवड केल्यानंतर त्याला राज्यपाल मान्यता देतील का? या मुद्द्यावरून सदस्यांची निवड रखडली आहे. निवडक उमेदवारांची यादी या समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविली असून, मुख्यमंत्र्यांकडून चार सदस्य निश्चित होतील. त्यानंतर त्यावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब होईल. मात्र यापूर्वीही आणि आत्ताही दोनदा अर्ज मागवून, अंतिम परीक्षा होऊनही आयोगातील सदस्यांची निवड होऊ शकली नाही.
राज्याचे प्रशासकीय कामकाज सांभाळण्यासाठी सक्षम कारभाऱ्यांची निवड न झाल्याने देशव्यापी बैठकीवेळी रिक्त पदामुळे महाराष्ट्राची नाचक्की होते. देशात आयोगाच्या सदस्यांची निवडी आणि नियुक्ती रखडल्याचे महाराष्ट्र हे एकमेव उदाहरण ठरलं आहे.
----------------------------------------
..अशी असते निवड प्रक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह महसूल, गृह आणि कायदा व सुव्यवस्था, उच्च व तंत्रशिक्षण आणि सामान्य प्रशासन या सर्व विभागांचे सचिव करतात. अध्यक्षांसह सहा सदस्यांची निवड समिती असते. मंत्रिमंडळ आलेल्या अर्जांतून पात्र उमेदवारांची निवड करून नाव राज्यपालांच्या मंजुरीसाठी सादर करते. हा ठराव मंजुरीसाठी मुख्यमंत्री राज्यपालांकडे पाठवतात. त्यानंतर अध्यक्षांसह सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात.
___________