कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या दागिन्यांचे मुल्यांकन सुरू, पुढील दहा दिवस चालणार काम
By इंदुमती सूर्यवंशी | Published: June 18, 2024 06:59 PM2024-06-18T18:59:45+5:302024-06-18T19:00:31+5:30
..यावरून दागिन्याचे मुल्य ठरवले जाईल
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या २०२० सालापासूनच्या दागिन्यांचे मुल्यांकन मंगळवारपासून सुरू झाले. यापूर्वी २०१९ सालापर्यंतच्या दागिन्यांचे मुल्यांकन झाले आहे. त्यानंतरच्या काळात कोरोना सुरू झाला. आता मुल्यांकनाला मुहुर्त लागला असून नाशिक येथील वडनेरे ॲन्ड सन्स या सरकारमान्यताप्राप्त संस्थेकडून पुढील दहा दिवस ही प्रक्रिया केली जाईल. दागिना देवीला अर्पण झाला त्यावर्षी ३१ मार्च रोजी सोन्या-चांदीचा दर किती होता यावरून दागिन्याचे मुल्य ठरवले जाईल.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. यथाशक्ती देवीला सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करतात. या दागिन्यांचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून मुल्यांकन करून घेतले जाते. सन २०१९ पर्यंतच्या दागिन्यांचे मुल्यांकन झाले होते. आता २०२०-२१ या आर्थिक वर्षापासूनच्या दागिन्यांच्या मुल्यांकनाला सुरुवात झाली.
समितीच्या मंदिर आवारातील कार्यालयात नितीन वडनेरे, सचिन वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पिंपळगावकर, विशाल आगरकर, महेश महामुनी, एकनाथ पारखी यांच्यासह सात जणांची टीम मुल्यांकन करत आहे. यावेळी मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, समितीच्या सहसचिव शीतल इंगवले, खजिनदार महेश खांडेकर, निवास चव्हाण उपस्थित होते.
या दागिन्यांचा समावेश
सोने : मणी, मंगळसुत्र, अंगठी, सोन्याची नाणी, नथ, कानातले, हार, नेकलेस, बोरमाळ, किरीट.
चांदी : पैंजण जोडवी, पाळणे, डोळे, फुलं, नामी, अंगठी, देवीची मूर्ती, छत्र, देवीची प्रतिमा, किरीट.