कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:16+5:302020-12-17T04:49:16+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे नळजोडणीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण जिल्हा परिषदेने पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे नळजोडणीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण जिल्हा परिषदेने पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
जलजीवन मिशनबाबत ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बुधवारी दुपारी व्हीसीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी जलजीवन मिशनमध्ये राज्य शासनाचा ५० टक्के वाटा असून मुदतीमध्ये घरोघरी नळाद्वारे पाणी देण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्याने सन २०२०-२१ या वर्षी देण्यात आलेले नळजोडणीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण केल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांचे अभिनंदन केले. कोल्हापूर जिल्ह्याचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून इतर जिल्ह्यांनीही पुढाकार घेऊन देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. यावेळी मित्तल यांनी अध्यक्ष बजरंग पाटील यांचा सन्मानपत्र देऊन शासनाच्या वतीने सत्कार केला.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात १४२.३६ लाख कुटुंबे असून प्रत्येक कुटुंबाला नळाने पिण्याचे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट येत्या चार वर्षांत पूर्ण करायचे आहे. सन २०२०-२१ या वर्षामध्ये ४३.५१ लाख नळजोडणीच्या उद्दिष्टासह नऊ जिल्ह्यांमध्ये १०० टक्के घरांना नळाने पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
१६१२२०२० कोल झेडपी ०१
नळजोडणीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांना शासनाच्या वतीने अमन मित्तल यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मनीष पवार, प्रियदर्शिनी मोरे उपस्थित होत्या.