कोल्हापूरच्या हद्दवाढीवर २०२४ पूर्वी योग्य तो निर्णय, महिन्याभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; पालकमंत्र्यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:23 PM2023-02-18T13:23:43+5:302023-02-18T13:26:48+5:30
बैठकीत प्रचंड गदारोळ, घोषणाबाजीने तणाव
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ प्रश्नी एक महिन्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सर्वसमावेशक बैठक घेतली जाईल. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन २०२४ पूर्वी हद्दवाढीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी रात्री येथे आयोजित केलेल्या बैठकीत दिली. कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण अधिक सक्षम करण्याची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखविली.
हद्दवाढ प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी हद्दवाढ समर्थक आणि विरोधक यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सुमारे दोन तास ही बैठक झाली. बैठकीचा समारोप करताना केसरकर यांनी ही ग्वाही दिली.
हद्दवाढीबाबत दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. हद्दवाढीचा निर्णय घेण्याचा अधिकार जरी राज्य सरकारचा असला तरी ग्रामीण जनतेला विश्वासात घ्यावेच लागेल. म्हणूनच पुन्हा एकदा एक महिन्याच्या आत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेतली जाईल. तुम्ही म्हणाला तर समर्थक आणि विरोधक यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जातील. गेल्या बावीस वर्षात हद्दवाढीवर निर्णय झाला नाही, पण आम्ही मात्र २०२४ पूर्वी तो घेऊ, असे केसरकर म्हणाले.
कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण स्थापन करण्यामागे गावांचा विकास करण्याचा प्रमुख हेतू होता. प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांचा विकास करुन ती कोल्हापूर शहरात समाविष्ट करायची होती. परंतु प्राधिकरणाकडे तितक्या गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे प्राधिकरण सुद्धा अधिक सक्षम करण्यावर जोर दिला पाहिजे असे माझं मत आहे.
प्राधिकरणाच्या माध्यमातून ग्रामीण विभागाचा विकास आराखडा तयार केला पाहिजे. क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशनने जो १२ गावांचा प्रस्ताव दिला आहे, त्या गावांना जाऊन मी भेटी देणार आहे. तेथील जनतेशी चर्चा करणार आहे. मला काही वेळ द्या, असे केसरकर म्हणाले.
आडगुळे, पोवार, केसरकर शाब्दिक चकमक
केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन देताच ॲड. महादेवराव आडगुळे यांनी त्यांना मध्येच अडवून ‘हे किती वेळा आम्ही ऐकायचे’? असा प्रश्न केला. तेव्हा केसरकर संतप्त झाले. तुम्ही मध्येच बोलणार असाल तर मी बोलायचे थांबवितो. मलाही ही मिटिंग पुढे चालवायची इच्छा नाही.
खासदार धैर्यशील माने बोलत असताना आर.के. पोवार यांनी त्यांना अडविल्यानेही पालकमंत्री संतप्त झाले. आर.के. साहेब, माने खासदार आहेत, त्यांना अडवू नका. तुम्ही आणि मी एकत्र काम केले आहे. त्यामुळे इतरांचा मान राखा, असा सल्ला केसरकर यांनी पोवार यांना दिला.
घोषणाबाजीने सभागृह दणाणले
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आधी हद्दवाढ विरोधी समितीच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी समर्थन समितीच्या सदस्यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. परंतु बाबा इंदूलकर जेव्हा हद्दवाढीची बाजू मांडायला लागले तेव्हा मात्र विरोधी गटाने इंदूलकरांच्या बोलण्यात अडथळे आणायला सुरवात केली. तरीही बाबा इंदूलकर यांनी आपली बाजू ठामपणे मांडणे सुरुच ठेवले. त्यामुळे विरोधी गटाने सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. वातावरण थोडे तणावपूर्ण झाले. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी आवाहन करुनही विरोधी गटाचे सदस्य सभागृहात बसले नाहीत, ते बाहेर निघून गेले.