बिद्री कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प उभारणीस मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:37 PM2018-09-26T23:37:54+5:302018-09-26T23:37:58+5:30
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी इथेनॉल प्रकल्प उभारणीस टाळ्यांचा गजरात मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. या सभेत ९६ कोटी ५० लाखांचा डिस्टिलरीसह इथेनॉल प्रकल्प, आठ हजार गाळप क्षमता विस्तारीकरण, नऊ हजार ८२० पात्र सभासद नियम व अटी पूर्ण करून करणे, २३१ रुपयांचे थकीत देणे, २०१९ नंतर नोकर भरती या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, केवळ साखर उत्पादन करून साखर कारखाने चालविणे सद्य:स्थितीत अवघड बनले आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळात सहवीज प्रकल्प उभारल्यामुळेच बिद्रीला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काळानुसार बदलणे आवश्यक
असून सभासदांच्या हितासाठी कारखान्यामार्फत इथेनॉल प्रकल्प उभारला जाईल. वीज व पेट्रोलियम पदार्थांची गरज ही कायमपणे लागणार असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल प्रकल्प उभारणासाठी प्रोत्साहन धोरण जाहीर केले असून ६ टक्के व्याजदराने ८० कोटीपर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ९६ कोटी ५० लाख खर्च उपेक्षित आहे. शासनाच्या उपक्रमाचा लाभ घेऊन तो शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी यापूर्वी मंजूर असलेल्या डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्प उभारत आहे.
पाटील म्हणाले, कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांचा ऊस वेळेत गाळप होण्यासाठी कारखान्याची गाळप क्षमता आठ हजार मे. टनांपर्यंत वाढविण्याचा मागील वार्षिक सभेत निर्णय घेतला असून, त्याचा परवाना मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऊस लावणीची नोंद शेतकºयांच्या शेतावर जाऊन मोबाईल टॅबद्वारे घेतली जाणार असून त्याची नोंद आॅनलाईन कारखान्याकडे करून ऊस तोडणी कार्यक्रमात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या हंगामात ऊस टोळ्यांसाठी अॅडव्हान्स देऊन पुरेशी तोडणी यंत्रणा सक्षम केलेली आहे.
चर्चेत तानाजी खोत, बी. टी. मुसळे, शहाजी शिंदे, बंडा पाटील, पांडुरंग जरग, आदींनी सहभाग घेतला. सभेस कारखान्याचे संचालक याबरोबरच सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, मार्केट कमिटीचे संचालक नेताजी पाटील, नाथाजी पाटील, जि. प.चे सदस्य मनोज फराकटे, राहुल देसाई, दिग्विजय पाटील, सुनीलराव कांबळे, बाळासाहेब भोपळे, पं. स.चे माजी सदस्य रघुनाथ कुंभार, एकनाथ चव्हाण, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, भूषण पाटील, माजी सरपंच विकास पाटील, एम. एस. पाटील उपस्थित होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी नोटीस वाचन केले. सचिव एस. जी. किल्लेदार यांनी मागील सभेचे प्रोसिंडिग वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.