नाट्यगृह बांधकामास मंजुरी
By admin | Published: November 5, 2015 11:42 PM2015-11-05T23:42:32+5:302015-11-05T23:53:33+5:30
गडहिंग्लज पालिका सभा : ‘बाजार समिती’वर खणगावे यांना संधी
गडहिंग्लज : डॉक्टर कॉलनीतील मुलींच्या हायस्कूलनजीकच्या खुल्या जागेत तीन कोटी ३० लाखांचे सांस्कृतिक केंद्र, वाचनालय इमारत या बहुउद्देशीय नाट्यगृहाच्या बांधकामास नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश बोरगावे होते. नगरपालिकेने सुसज्ज व अद्ययावत नाट्यगृह बांधावे, अशी नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यामुळेच बहुउद्देशीय नाट्यगृह बांधण्याचा निर्णय सभागृहात झाला.
गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हूणून बसवराज खणगावे यांना नगरपालिका प्रतिनिधी म्हणून पाठवावे, अशी सूचना नरेंद्र भद्रापूर यांनी मांडली. त्यास नितीन देसाई यांनी अनुमोदन दिले.
रजनीगंधा चौकातील महालक्ष्मी स्वीट मार्टनजीक पोलीस चौकी सुरू करावी, अशी सूचना हारुण सय्यद यांनी केली. मात्र, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार असल्यामुळे साने गुरुजी वाचनालयानजीक पोलीस चौकीसाठी जागा देण्यास मान्यता दिली. दिवाळीत फळविक्रेत्यांना पूर्वीच्या ठिकाणीच बसू द्यावे, अशी सूचनाही सय्यद यांनी केली. त्यावेळी सभागृहात एक आणि बाहेर एक अशी भूमिका नको, असा टोला भद्रापूर यांनी हाणला. याबाबत दिवाळीनंतर ठोस भूमिका घेऊया, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
इराणी वसाहतीत फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याची सूचना प्रा. स्वाती कोरी यांनी केली. यावर शौचालय खरेदीला त्यांनी घेतलेल्या आक्षेपाची आठवण लक्ष्मी घुगरे यांनी करून दिली. यावर कोरी म्हणाल्या, १३ व्या वित्त आयोगातून शौचालय खरेदीस आपण आक्षेप घेतला होता. इराणी झोपडपट्टीत शौचालय बांधणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्या अतिक्रमणास गांधीनगर नागरिकांचा विरोध असल्यामुळे तिथे पक्की शौचालये बांधू नयेत. त्यामुळेच तिथे फिरत्या शौचालयांचा उपयोग करावा.
उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांनी पथदिव्यांच्या निविदेतील दरपत्रकास हरकत घेतली. कच्ची पावती दाखवू नका, बाजारभावापेक्षा कमी व शासनाने प्रमाणित केलेल्या पॉलिकॅप कंपनीची वायरच खरेदी केल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. आझाद रोडवरील गटारी बांधण्यास, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड डांबरीकरणास मंजुरी दिली. राष्ट्रवादीचे नगरसेवक रामदास कुराडे व दीपा बरगे वगळता सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी तानाजी नरळे उपस्थित होते.