मंडलिक कारखान्याच्या विस्तारीकरणाला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:51+5:302021-03-05T04:23:51+5:30
विस्तारीकरणाला मान्यता : २४ वी वार्षिक सभा ऑनलाइन म्हाकवे कारखान्याच्या प्रतिदिन ऊस गाळपासह सर्वच विभागाचे विस्तारीकरण करण्यात यावे. ...
विस्तारीकरणाला मान्यता : २४ वी वार्षिक सभा ऑनलाइन
म्हाकवे कारखान्याच्या प्रतिदिन ऊस गाळपासह सर्वच विभागाचे विस्तारीकरण करण्यात यावे. अशी मागणी करत सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या सभासदांनी या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला.
हमिदवाडा, ता. कागल सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन झूमद्वारे झाली. यावेळी सहभागी सर्वच सभासदांनी या ठरावाला मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक होते.
सध्या असणारी प्रतिदिन ४ हजार गाळप क्षमता १० हजार, सहवीज प्रकल्प १२ मेगावॅटवरून ४५ मेगावॅट, तर डिस्टलरी प्रतिदिन ३० हजार केएलपीडी वरून १ लाखापर्यंत करावी, अशी मागणी सभासदांकडून करण्यात आली.
यावेळी खासदार मंडलिक म्हणाले, आपला कारखाना मल्टीस्टेट करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. एप्रिलमध्ये डिस्टलरीचे कामही पूर्ण होईल. त्यामुळे आता विस्तार करण्याकडे लक्ष देऊ. विषय वाचन कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले. यावेळी दादासाहेब पाटील (सिद्धनेर्ली) यांनी ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांच्या लुटीबाबत, मधुकर भोसले (बस्तवडे) यांनी बस्तवडे येथून वाहनांना वाहतूक दर वाढावा, लगमाण्णा कांबळे यांनी कंपोस्ट खत वाहतुकीला अनुदान, नगराध्यक्ष राजेखान जमादार, जयवंत पाटील यांसह अनेकांनी गाळप क्षमता वाढविण्याची, तर सत्यजित पाटील (सोनाळी) यांनी कारखान्याने सोलर प्रकल्प राबविण्याची मागणी केली. तसेच सुहास खराडे, आर. डी. पाटील, उत्तम पाटील, राजेश उत्तुरे, एकनाथ चौगुले यांनी सहभाग घेतला.
यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, शिवाजीराव इंगळे, आनंदा मोरे, विरेंद्र मंडलिक, प्रकाश पाटील, धनाजी बाचणकर, शहाजी यादव, राजश्री चौगुले, नंदिनीदेवी घोरपडे यासह संचालक, कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. संचालक मसू पाटील यांनी आभार मानले.
घरबसल्याच समस्या मांडत केल्या सूचनाही...
या वार्षिक सभेत २५०हून अधिक सभासद सहभागी झाले होते. त्यांनी घरबसल्याच मला ऊसतोड अद्याप मिळालेली नाही, ऊसतोड मजुरांकडून लूट होत आहे, ठेकेदारांकडून फसवणूक झाली आहे. अशा समस्या मांडल्या. या सर्व समस्यांचे अध्यक्ष मंडलिक यांनी निराकरण केले.
मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यात कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एकरी ऊस उत्पादन वाढवावे, कारखान्याकडे ठेवी ठेवून सहकार्य करावे, कारखान्याकडून ऊस विकास योजना राबवत आहोत, ठिबकला अनुदान दिले जात, असून त्याला प्राधान्य द्यावे. सर्व सभासद शेतकरी, ऊसतोड मजूर, वाहनधारक, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे.
सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सभेत सभासदांच्या समस्या, सूचना जाणून घेताना अध्यक्ष संजय मंडलिक यावेळी बंडोपंत चौगुले, वीरेंद्र मंडलिक आदी.
छाया-जे.के.फोटो, सुरुपली