kolhapur: ‘राजाराम’च्या सभेत कार्यक्षेत्र वाढीसह सर्व विषय मंजूर; विरोधकांकडून पोटनियम दुरुस्ती पत्रकाची होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:53 PM2023-09-30T12:53:38+5:302023-09-30T12:54:29+5:30
माजी आमदार महादेवराव महाडिक यांची आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये व्यासपीठावर एन्ट्री
कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्षेत्र वाढीसह इतर पोटनियम दुरुस्तीस बहुमताने मंजुरी देण्यात आली. विरोधकांनी पोटनियम दुरुस्तीला कडाडून विरोध करत समांतर सभा घेत सत्तारूढ गटावर टीकेची झोड उठवली. पाेटनियम दुरुस्तीची विरोधकांनी होळी केली. ऊस दुसऱ्या कारखान्याला घालणाऱ्यांना निवडणुकीपुरता ‘राजाराम’ कारखाना पाहिजे का, असा सवाल करत कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज व इथेनॉल प्रकल्प व भविष्यातील उसाची गरज पाहूनच कार्यक्षेत्र वाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
कारखान्याच्या कार्यस्थळावर अध्यक्ष अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सभा ४० मिनिटे चालली. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह संचालक उपस्थित होते. सचिव उदय मोरे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी अहवाल वाचन केले. अध्यक्ष अमल महाडिक यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत, आगामी काळातील प्रकल्पांबाबत माहिती दिली.
अमल महाडिक म्हणाले, कार्यक्षेत्रातील गावांचे झपाट्याने नागरीकरण होत असल्याने पिकावू जमिनी कमी होत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गामुळे हजारो हेक्टर जमिनी रस्त्यासाठी गेल्या आहेत. इतर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्याने उसाची टंचाई भासणार आहे. सहवीज प्रकल्पासाठी २५ कोटी भागभांडवलाची गरज आहे, वाढीव सभासदांच्या माध्यमातून त्याची पूर्तता करता येणार आहे. या सगळ्यांचा विचार करून कार्यक्षेत्र वाढण्याचा निर्णय घेतला.
विरोधक, सत्ताधाऱ्यांच्या घोषणांनी गोंधळ
विरोधी गटाचे सर्जेराव माने, मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, मिलिंद पाटील आदी साडेदहा वाजता सभास्थळी आले. मात्र, अगोदरच सभामंडप भरल्याने त्यांना पुढे जाता येईना. यावेळी सत्तारूढ व विरोधी समर्थकांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी काही काळ गोंधळ उडाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
इर्षा विरोधकांशी नव्हे खासगी कारखान्यांशी
काही मंडळींनी पोटनियम दुरुस्तीसह इतर बाबींवर आक्षेप घेतले आहेत. त्याचे स्पष्टीकरण आम्ही त्यांना दिले असून, आमची इर्षा, स्पर्धा विरोधकांशी नव्हे, तर जिल्ह्यातील खासगी व इतर कारखान्यांपेक्षा जादा दर देण्याबाबत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
अहं....२१-० विसरायचे नाही
सभास्थळी निवडणुकीत सत्तारूढ गटाने २१-० ने विरोधकांचा धुव्वा उडवल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अहं...२१-० विसरायचे नाही’ असे फलक झळकवण्यात आले.
सभेपूर्वीच मंजूर मंजूरचे फलक
सभास्थळी सकाळी लवकर सत्तारूढ गटाचे समर्थक येऊन बसले होते. त्यांच्या हातात मंजूर, मंजूर असे लिहिलेले फलक होते. सभा सुरू होण्याआधीच ते नेत्यांच्या छबीच्या पोस्टरसह फलक झळकावत होते.
महाडिक महाडिक धूमधडाका..
माजी आमदार महादेवराव महाडिक हे आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये व्यासपीठावर येताच, समर्थकांनी ‘महाडिक महाडिक... धूमधडाका’ या घोषणांनी सभामंडप दणाणून सोडला.
सभेला तोबा गर्दी....
शुगर मिल कॉर्नरपासून चारचाकी व दुचाकी गाड्या रस्त्याच्या दुतर्फा लावल्या होत्या, त्याचबरोबर वाहनतळ, गाडीअड्डाही हाऊसफुल झाला होता.
फलकातून आरोप-प्रत्यारोप
सत्तारूढ गट :
- स्वत:च्या गगनबावड्यातील खासगी सहकारी साखर कारखान्याची सभा बंद खोलीत २०० कामगार बसवून सकाळी ११ वाजता घेतली. त्यांना आमच्या सभेबाबत बोलण्याचा अधिकार काय?
- ‘डीवाय’ खासगी सहकारी कारखान्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासदांचा भरणा आहे, त्यांनी आम्हाला ‘मल्टिडिस्ट्रिक्ट’चा शहाणपणा सांगावा का?
विरोधी गट :
- कोल्हापुरातील सभासद कमी करून सांगलीतील सभासद वाढवण्याचा अट्टहास कशासाठी
- ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्यात अपयश आल्यानंतर ‘राजाराम’ मल्टिडिस्ट्रिक्टच्या आडून येलूर परिसरातील सभासद वाढवण्याचा घाट.
- तीन वर्षे सर्वसाधारण सभेला गैरहजर राहिला तर सभासदत्व रद्द, हा सभासदांवर अन्याय नाही का?
अमल महाडिक यांनी केल्या सरकारकडे मागण्या :
- साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० वरून ३६०० रुपये करा
- ऊस पिकाचा पीक विम्यात सभावेश करावा
- दुष्काळामुळे हंगामी कर्ज परतफेडीस दोन वर्षांची मुदतवाढ व व्याज अनुदान मिळावे.
- इथेनॉल प्रकल्पासाठी दीर्घ मुदतीचे, बिनव्याजी कर्ज मिळावे, पेट्रोलमधील मिश्रण २० टक्के करावे.
- प्रलंबित व्याज अनुदान तातडीने द्यावे
- साखर निर्यात करावी.