कागलला आयुर्वेदिक, उत्तूरला योग, निसर्गोपचार महाविद्यालय मंजूर; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती

By समीर देशपांडे | Published: August 7, 2024 06:56 PM2024-08-07T18:56:04+5:302024-08-07T18:56:32+5:30

वर्षभरात तीन रूग्णालये

Approval of Government Ayurveda College, Ayurveda Hospital and Degree College of Yoga and Naturopathy in Kolhapur district; Guardian Minister Hasan Mushrif gave the information | कागलला आयुर्वेदिक, उत्तूरला योग, निसर्गोपचार महाविद्यालय मंजूर; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती

कागलला आयुर्वेदिक, उत्तूरला योग, निसर्गोपचार महाविद्यालय मंजूर; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती

कोल्हापूर : कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, संलग्न १०० रुग्ण खाटांचे आयुर्वेद रुग्णालय आणि उत्तूर ता. आजरा येथे योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

केंद्र शासनाच्या व भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून कागल येथे हे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. निकषानुसार आवश्यक जागा उपलब्ध करुन घेण्यात येणार असून या महाविद्यालय, रूग्णालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन निर्माण करण्यास व भरण्यासही तसेच बांधकाम आणि त्याच्या खर्चासही शासनाने मंजुरी दिली आहे.

मुश्रीफ म्हणाले याबरोबरच उत्तूर, ता.आजरा येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रूग्ण खाटांच्या रूग्णालयासही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.  माझ्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत यासाठी निकषानुसार आवश्यक व सुयोग्य जागा किमान ३ एकर निश्चित करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात केंद्रीय संस्थेद्वारा नोंदणीकृत योग व निसर्गोपचार विषयक शिक्षण देणारी (पदविका / सर्टिफिकेट कोर्स) व उपचार करणाऱ्या एकुण पाच संस्था (केंद्रीय व खाजगी) कार्यरत आहेत. या संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी बी.एन.वाय.एस. साठी विहीत केलेला ‘पदवी अभ्यासक्रम’ राबवित नाहीत. तसेच, महाराष्ट्र राज्यात योग व निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमाचे एकही शासकीय महाविद्यालय नाही. म्हणूनच उत्तूर, ता.आजरा येथे हे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालयासाठी  आवश्यक असणारी पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने भरण्यास मान्यता देण्यात आले आहे. महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्चास  मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वर्षभरात तीन रूग्णालये

मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर केवळ वर्षभरात आपल्या कागल मतदारसंघात तीन रूग्णालये आणि दोन महाविद्यालये मंजूर करून आणली आहेत. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत एक मोठे रूग्णालय त्यांनी आधीच कसबा सांगाव येथे मंजूर करून आणले आहे.

Web Title: Approval of Government Ayurveda College, Ayurveda Hospital and Degree College of Yoga and Naturopathy in Kolhapur district; Guardian Minister Hasan Mushrif gave the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.