कोल्हापूर जिल्ह्याच्या ५२५ कोटींच्या खर्चाला मान्यता, निधी शंभर टक्के खर्च करण्याची पालकमंत्र्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:15 PM2023-06-27T14:15:49+5:302023-06-27T14:16:14+5:30
पावसाळ्यात परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी पाणी उपशासाठी दर्जेदार पंप बसवा
कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शंभर टक्के निधी खर्च होईल, याची दक्षता घ्या, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मार्च २०२३ अखेर ५२५.१४ कोटींच्या झालेल्या खर्चाला मान्यता देण्यात आली. २०२३-२४च्या अर्थसंकल्पित ५९८.६७ कोटींपैकी मिळालेल्या ४८.३४ कोटींच्या तरतुदीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, पी.एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार उपस्थित अधिकारी उपस्थित होते.
विविध योजनांसाठी राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आलेल्या अतिरिक्त मागणीनुसार २०२२-२३ मधील ४२५ कोटींच्या अर्थसंकल्पित निधीत ५५ कोटींची वाढ करुन जिल्ह्याला ४८० कोटींचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी तरतुदीची माहिती दिली.
परिख पुलाखाली पंप लावा रे..
पावसाळ्यात परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी पाणी उपशासाठी दर्जेदार पंप बसवा. तोपर्यंत रोडओव्हर ब्रीजचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या.
प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नाही : जिल्हाधिकारी
केंद्र शासनाच्या प्रदूषित नद्यांमधील यादीतून आता पंचगंगा नदीचे नाव वगळण्यात आल्याची बाब आनंदाची असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, त्यांची लवकरच निविदा काढली जाईल. इचलकरंजीतील अन्य उद्योगांच्या पाण्यावरील प्रक्रियेसाठीचा डीपीआर तयार असून, एमआयडीसीकडून त्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच ८९ गावांमधून नदीत मिसळणारे सांडपाणी थांबविण्यासाठीही कार्यवाही सुरू आहे. पुढील अडीच वर्षात पंचगंगेचे प्रदूषण शून्य होणार आहे.
मानधनावर शिक्षक नेमा
यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची १६१५ पदे रिक्त असून, मुलांनी शिक्षणासाठी जायचे कुठे, असा प्रश्न मांडला. अशाने विद्यार्थी गळती होईल त्यामुळे शिक्षक भरती होईपर्यंत मानधनावर नियुक्ती करावी, अशी सूचना केली.