रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर
By admin | Published: June 21, 2017 01:12 AM2017-06-21T01:12:31+5:302017-06-21T01:12:31+5:30
महापालिका सभेत अभूतपूर्व गोंधळ : अंगावर धावून जाण्याचे प्रकार; राजदंड पळविण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवरील बंद झालेल्या मद्यविक्रीस प्रत्यक्ष प्रोत्साहन देणारा रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यावरून महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ झाला.
सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याने तब्बल पाच तास शाहू सभागृह जणू कुस्तीचा आखाडाच बनले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह धक्काबुक्की, जोरदार घोषणाबाजी आणि राजदंड पळविण्याच्या प्रयत्नामुळे सभागृहाच्या कामकाजाचा लांच्छनास्पद इतिहास लिहिला गेला. अखेर रस्ते हस्तांतरणाचा वादग्रस्त ठराव सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमताने जिंकला. त्यामुळे या रस्त्यांवरील मद्यविक्रीचा मार्ग मोकळा झाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शहरातून जाणारे चार राज्यमार्ग व एका राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्रीची ८९ दुकाने बंद झाली आहेत. ती चालू करता यावीत म्हणून महापालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीतर्फे हे पाच रस्ते ताब्यात घेण्याचा ठराव मांडला होता. त्यास भाजप-ताराराणी आघाडीने तीव्र विरोध केला. सभागृहात झालेला हा विरोध मोडून काढत सत्तारूढ आघाडी सदस्यांनी बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करून घेतलाच; शिवाय ते टीकेचे धनीही बनले.
ठरावाला विरोध करताना सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. ‘दारूबंदी झालीच पाहिजे,’ अशा घोषणांनी सभागृह दुमदुमले. त्याच वेळी सत्तारूढ सदस्यांनीही ‘रस्ते हस्तांतर झालेच पाहिजे’ अशा घोषणा देत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या घोषणाबाजीवेळी सत्तारूढ सदस्य प्रतापसिंह जाधव यांनी विरोधी गटाच्या कमलाकर भोपळे यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. कोण काय बोलतोय हे कळत नव्हते एवढी आरडाओरड सुरू होती. शेवटी महापौर हसिना फरास यांनी अर्ध्या तासाकरिता सभागृह तहकूब केले.
एक तासानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले; परंतु दोन्ही बाजूंची आक्रमकता कायम होती. विरोधी गटाचे सदस्य सभाध्यक्ष महापौर फरास यांच्यावर ठराव नामंजूर करण्यासाठी दबाव टाकत राहिले. त्याचवेळी सत्तारूढ सदस्य तितक्याच ताकदीने आपली बाजू पुढे दामटत राहिले. त्यामुळे ईर्षेने पेटून उठलेल्या दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. त्याच वेळी विलास वास्कर यांनी राजदंडाला हात घातला आणि तो हिसकावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. किरण नकाते व संतोष गायकवाड यांनीही राजदंड खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुन्हा अभूतपूर्व गोंधळ उडाला. महापौरांनी सर्वांना सक्त ताकीद देऊन शांत केले आणि ठरावावर मतदान घेतले.