बहिरेवाडीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेस मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:51 AM2020-12-11T04:51:17+5:302020-12-11T04:51:17+5:30
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे २५ वर्षांपासून मंजूर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र जागेअभावी रखडले होते. या केंद्रास शासनाने ...
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे २५ वर्षांपासून मंजूर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र जागेअभावी रखडले होते. या केंद्रास शासनाने गायरानमधील जागा मंजूर केल्याने गावामध्ये दवाखान्याचा प्रलंबित प्रश्न पूर्णत्वास गेल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी दिली.
१९९६ साली पन्हाळा पंचायत समितीचे तत्कालीन सभापती स्व. विश्वनाथ जाधव-सरनाईक यांनी बहिरेवाडी गावास प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते, पण गेले कित्येक वर्षांपासून केंद्राचे काम जागेअभावी रखडले होते. गावामधील नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी ४ ते ५ किलोमीटर लांब जावे लागायचे, याचा विचार करून गावचे लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष पाठपुरावा करून गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा जागेचा प्रश्न अखेर मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले.
आमदार डाॅ. विनय कोरे, वारणा दूध संघाचे संचालक एच. आर. जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून जागेचा प्रश्न सोडवला गेला. यामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि गेले कित्येक वर्षांपासूनची वणवण आता थांबणार असल्याचेही सरपंच जाधव यांनी सांगितले. बहिरेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रास जागा मंजूर झाल्यानंतर आतषबाजी करण्यात आली. यावेळी उपसरपंच तानाजी सरनाईक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. ...............................................
फोटो ओळ...बहिरेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जागा मंजुरीच्या यशाबद्दल आ. विनय कोरे यांचा सत्कार वारणा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक एच. आर. जाधव यांनी केला. यावेळी सरपंच शिरीषकुमार जाधव, उपसरपंच तानाजी सरनाईक, अमर जाधव, महादेव सरनाईक, आदी उपस्थित होते.