चव्हाणवाडी केंद्रशाळेस तत्काळ वर्गखोल्या मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:05 AM2021-02-20T05:05:22+5:302021-02-20T05:05:22+5:30
पन्हाळा - लोकमत न्यूज नेटवर्क : चव्हाणवाडी केंद्र शाळेस तत्काळ वर्ग खोल्या मंजूर व्हाव्यात, या मागणीसाठी पंचायत समितीसमोर पन्हाळा ...
पन्हाळा - लोकमत न्यूज नेटवर्क : चव्हाणवाडी केंद्र शाळेस तत्काळ वर्ग खोल्या मंजूर व्हाव्यात, या मागणीसाठी पंचायत समितीसमोर पन्हाळा तालुका मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. चव्हाणवाडी केंद्रशाळेची इमारत धोकादायक बनल्यामुळे दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्लेखन आदेश दिला आहे पण नव्याने शाळा बांधण्यास निधी मंजूर केला नाही. या शाळेमध्ये १ ली ते ७ वीपर्यंत वर्ग आहेत त्यात ८० विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर ही केंद्र शाळा असून त्याअंतर्गत १२ जि. प. शाळा व २ माध्यमिक शाळा संलग्न आहेत; परंतु सध्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एकसुद्धा खोली उपलब्ध नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना उघड्या मैदानामध्ये शिकवावे लागते. याचा निषेध करण्यासाठी व शाळेस तत्काळ खोल्या मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पन्हाळा पंचायत समितीसमोर मनसेतर्फे उग्र आंदोलन करण्यात आले. याबाबत गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांनी सदर शाळा लवकरात लवकर शाळा बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असून जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव दाखल केल्याचे पत्र आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात मनसे तालुका अध्यक्ष विशाल मोरे, अमर बचाटे, नयन गायकवाड, लखन लादे आदींनी सहभाग घेतला होता.
फोटो १८ पन्हाळा मनसे
चव्हाणवाडी येथील पन्हाळा पंचायत समितीसमोर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.