कोल्हापूर महापालिकेचा कारभार संथ, नोकर भरतीस मंजूरी द्या; आमदार जयश्री जाधव यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
By विश्वास पाटील | Published: October 3, 2023 04:41 PM2023-10-03T16:41:55+5:302023-10-03T16:42:47+5:30
नागरिकांची मोठी गैरसोय
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील कामकाज संथ सुरु असून नोकर भरतीच्या आकृतीबंधास तातडीने मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाने सुमारे 5 हजार 44 इतक्या पदांचा नवीन आकृतीबंध नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या आकृतीबंधात माहूर, गाडीवान, लेबर यांच्यासह इतर कालबाह्य 465 पदे रद्द करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात शिपाई पदे रद्द केली आहेत. नव्याने 400 पदांची निर्मिती केली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर, सिस्टीम मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर पदांचा समावेश आहे. या आकृतीबंधाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली नसल्याने महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारभार संथ गतीने सुरू असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
या आकृतीबंधास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात लक्षविधीद्वारे केली होती. या लक्षवेधी प्रश्नास नगर विकास विभागाने उत्तर दिले असून, यामध्ये महानगरपालिकेने सादर केलेल्या आकृतीबंधाची तपासणी करण्यात येत आहे. सन 2023 करता केवळ एक वेळची बाब म्हणून आस्थापना खर्चाच्या 35 टक्के मर्यादाची अट शिथिल करून अत्यावश्यक अत्यंत गरजेचे पदे भरण्याचे निर्देश महापालिकेस देण्यात आल्याचे नमूद केले आहे. मात्र, यामधून महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार गतिमान होणार नाही.
नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तसेच कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आकृतीबंधाला मंजुरी देणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर विकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास त्वरित मंजुरी द्यावी असे आमदार जाधव यांनी म्हटले आहे.