Khelo India Wrestling Kolhapur : कोल्हापूरसाठी कुस्ती केंद्र मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 12:02 PM2021-05-27T12:02:26+5:302021-05-27T12:04:39+5:30
Wrestling Kolhapur : खेलो इंडिया अंर्तगत महाराष्ट्रासह एकूण सात राज्यांकरिता केंद्र सरकारने खेळानुसार केंद्र स्थापन करण्यास बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या खेळांकरिता प्रत्येकी पाच लाखांचा निधीही मंजूर केला आहे. त्यात कोल्हापूरसाठी कुस्ती केंद्र होणार आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : खेलो इंडिया अंर्तगत महाराष्ट्रासह एकूण सात राज्यांकरिता केंद्र सरकारने खेळानुसार केंद्र स्थापन करण्यास बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या खेळांकरिता प्रत्येकी पाच लाखांचा निधीही मंजूर केला आहे. त्यात कोल्हापूरसाठीकुस्ती केंद्र होणार आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ४ जून २०२० मध्ये देशात एक हजार खेलो इंडिया केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यातून खेळाचा विकास व्हावा. हा उद्देश ठेवून देशातील महाराष्ट्र, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये खेळ प्रकारानुसार केंद्रांना मंजुरी दिली आहे.
प्रत्येक केंद्रासाठी प्राथमिक निधी म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर केले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पुढील प्रस्ताव तयार तो केंद्राला सादर करावयाचा आहे. जिल्हावार खेलो इंडियाच्या समिती स्थापन केली जाणार आहे. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्ह्यांकरिता खेळ प्रकारानूसार ही केंद्रे विकसित केली जाणार आहे. याबाबतची यादी भारतीय खेल प्राधिकरणकडून जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हावार केंद्र आणि खेळ असा,
कोल्हापूर, लातूर, रायगड, हिंगोली (कुस्ती), सातारा, नाशिक, चंद्रपूर, सांगली, नंदुरबार, गोंदिया (मैदानी खेळ), वाशिम, सिंधुदुर्ग, बीड, मुंबई उपनगर (कबड्डी),पालघर, जळगाव, वर्धा, मुंबई शहर, अकोला (बॉक्सिंग), जालना, उस्मानाबाद (खो-खो), बुलढाणा, भंडारा, परभणी (तलवारबाजी), नांदेड (टेबल टेनिस), धुळे (फुटबॉल), हॉकी (यवतमाळ), औरंगाबाद (नेमबाजी), सोलापूर, नागपूर, ठाणे, रत्नागिरी, (बॅडमिंटन), गडचिरोली, अहमदनगर, अमरावती, (धनुर्विद्या), पुणे (व्हॉलिबॉल) यांचा समावेश आहे.
जून २०२० मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ह्यखेलो इंडियाह्ण अंतर्गत कुस्तीच्या विकासासाठी हे केंद्र तयार केले आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन कुस्तीपटूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रासाठी प्रक्रिया निधी उपलब्ध झाल्यानंतर सुरू केली जाणार आहे.
- डॉ. चंद्रशेखर साखरे ,
जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर