Kolhapur- सर्किट बेंचसाठी २१ एप्रिलला जेलभरो, खंडपीठ कृती समितीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:12 PM2023-04-10T12:12:56+5:302023-04-10T12:13:20+5:30

खंडपीठ नागरी कृती समितीकडून पुन्हा एकदा सर्किट बेंच मागणीचे आंदोलन तीव्र केले जात आहे

April 21 Jail Bharo for Circuit Bench at Kolhapur, bench action committee determination | Kolhapur- सर्किट बेंचसाठी २१ एप्रिलला जेलभरो, खंडपीठ कृती समितीचा निर्धार

Kolhapur- सर्किट बेंचसाठी २१ एप्रिलला जेलभरो, खंडपीठ कृती समितीचा निर्धार

googlenewsNext

कोल्हापूर : करवीर संस्थान काळात कोल्हापुरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयही होते. कोल्हापूरला खंडपीठाची परंपरा आणि गरजही आहे. त्यामुळे सर्किट बेंचला परवानगी मिळाल्याशिवाय नागरी कृती समितीचा लढा थांबणार नाही, असा निर्धार श्रीमंत शाहू महाराज यांनी बिंदू चौकात झालेल्या निदर्शनांमध्ये व्यक्त केला.

तसेच या मागणीकडे सरकार आणि न्याय यंत्रणेचे लक्ष्य वेधण्यासाठी २१ एप्रिलला दुपारी बिंदू चौकात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. खंडपीठ नागरी कृती समितीच्या वतीने रविवारी (दि. ९) सायंकाळी बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मुख्यमंत्र्यांची भेट होताच कोल्हापूर सर्किट बेंचला परवानगी दिली जाईल, असे लेखी पत्र जिल्हा बार असोसिएशनला पाठवले आहे. त्या आश्वासनाची तातडीने पूर्तता होईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र दीड वर्ष उलटले तरी अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे खंडपीठ नागरी कृती समितीकडून पुन्हा एकदा सर्किट बेंच मागणीचे आंदोलन तीव्र केले जात आहे. रविवारी सायंकाळी बिंदू चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज यांनी करवीर संस्थानातील न्यायदान परंपरेचा उल्लेख करून सद्य:स्थितीत सर्किट बेंचची गरज व्यक्त केली.

आमदार सतेज पाटील यांनी सर्किट बेंचच्या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. तसेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि उदय सामंत यांनी याप्रश्नी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, जिल्हा बार असोसिशएनचे अध्यक्ष गिरीश खडके यांच्यासह कृती समितीचे विजय देवणे, वसंतराव मुळीक, भारती पवार, बाबा इंदूलकर, ॲड. महादेवराव आडगुळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार पी. एन. पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगावकर यांच्यासह सेवानिवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे, जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य, पक्षकार, नागरिक उपस्थित होते.

आता जेलभरो आंदोलन

सर्किट बेंच मागणीचे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी खंडपीठ नागरी कृती समितीच्या वतीने २१ एप्रिलला दुपारी १२ वाजता बिंदू चौकात जेलभरो आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती कृती समितीचे विजय देवणे यांनी दिली.

मेणबत्त्या प्रज्वलित करून निर्धार

सर्किट बेंच मागणीकडे लक्ष्य वेधण्यासाठी बिंदू चौकात मेणबत्त्या प्रज्वलित करून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. सर्किट बेंचच्या मागणीची घोषणा लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान केलेल्या आंदोलकांनी बिंदू चौकात जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: April 21 Jail Bharo for Circuit Bench at Kolhapur, bench action committee determination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.