अपंगांसाठी ४ एप्रिलला दिल्ली येथे धडक देणार
By admin | Published: February 15, 2016 12:39 AM2016-02-15T00:39:12+5:302016-02-15T01:11:45+5:30
बच्चू कडू : प्रहार अपंग क्रांती आंदोलन निर्धार मेळावा
कोल्हापूर : अपंग बांधवांच्या मागण्यांसाठी येत्या चार एप्रिलला दिल्लीत आंदोलन करणार आहे. राज्य सरकारने अपंगांसाठी कल्याणकारी निर्णय घ्यावेत, असे प्रतिपादन आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले. येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या निर्धार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कणेरीमठाचे प.पू.श्री मुपिन काडसिद्धेश्वर महाराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित होते. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या सभागृहात हा मेळावा झाला.बच्चू कडू म्हणाले, सन १९९५च्या अपंगांच्या कायद्याची अंमलबजावणी सन २०१६ ला झाली. राज्यात सुमारे ४० लाख अपंग बांधव आहेत; पण आतापर्यंत आॅनलाईन दाखले केवळ २० हजार अपंगांना मिळाले आहेत. सरकारकडून केवळ दोनशे रुपयांची तुटपुंजी मदत मिळते. सरकारने आदिवासी, दलित, मागासवर्गीय अपंगांसाठी काम केले पाहिजे. अपंगांच्या आंदोलनांमुळे आता सरपंचांपासून ते आमदारापर्यंत सर्वजण दखल घेत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. त्याचबरोबर समाजातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना याही अपंगांसाठी कार्य करतात. सरकारने प्रथमच अपंगांसाठी विनाअट घरकुल योजना सुरू केली. अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आता चार एप्रिलला दिल्लीत आंदोलन करणार आहे.
प.पू.श्री मुपिन काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, राष्ट्रासाठी सर्वांनी काम करावे. भविष्यात आपण एक नंबर होऊया असा संकल्प करावा. अविनाश सुभेदार म्हणाले, बच्चू कडू यांची आंदोलने सरकारला दखल घेण्यासारखी असतात. त्यांचे कार्य अपंगांसाठी उल्लेखनीय आहे. डॉ. रामानंद म्हणाले, सीपीआरमध्ये अपंग बांधवांसाठी आॅनलाईन दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
याप्रसंगी अपंग बांधवांना चादरी तर राजारामपुरीतील बाबासाहेब सामंत बालमंदिरच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
स्वागत अॅड. बी. जी. चौगुले यांनी, तर जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर तनवाणी, दिगंबर कुतेकर, सदाशिव शेटे, नगरसेवक शारंगधर देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, प्रशांत म्हेतर, सुरेश ढेरे, शैलेश सातपुते, रूपाली पाटील, कल्पना वावरे, उज्ज्वला चव्हाण, वैष्णवी सुतार, विजय शिंदे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते. कार्याध्यक्ष विकास चौगुले यांनी आभार मानले.