मनमानी कारभार खपवून घेणार नाही, मंत्री मुश्रीफ यांचा सज्जड दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:29 AM2020-08-31T11:29:59+5:302020-08-31T11:31:25+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर लोकांची कामे करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, सर्वांना विश्वासात घेऊन कामे करा, सत्ता आल्याच्या सहा महिन्यांतच तुम्ही मनमानी कारभार करणार असाल तर कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना रविवारी भरला.
कोल्हापूर: जिल्हा परिषदेवर लोकांची कामे करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, सर्वांना विश्वासात घेऊन कामे करा, सत्ता आल्याच्या सहा महिन्यांतच तुम्ही मनमानी कारभार करणार असाल तर कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना रविवारी भरला.
जिल्हा परिषदेमध्ये १५व्या वित्त आयोगासह अन्य निधी वाटप आणि पदाधिकारीसह कारभारी सदस्यांच्या कारभारावरून सत्ताधारी सदस्यांमध्येच सध्या जोरात धुसफूस सुरू आहे. या कारभारावरून नाराज झालेल्या सदस्यांनी मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे धाव घेत लक्ष घालण्याची विनंती केली होती. याची दखल घेत सत्ताधारी सदस्यांची बैठक रविवारी बोलावण्यात आली.
पालकमंत्री सतेज पाटील मुंबईला गेल्याने मंत्री मुश्रीफ यांनी एकहाती ही बैठक घेतली. सर्किट हाऊसवर तब्बल दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत मुश्रीफ यांनी सदस्य आणि पदाधिकारी यांचे स्वतंत्रपणे म्हणणे ऐकून घेतले.
बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासने, डॉ. पद्माराणी पाटील व सदस्य उपस्थित होते.
सदस्यांनी वाचले कारभाराचे पाढे
बैठकीत सदस्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे पाढे वाचले. अध्यक्षांपासून कोणतेही पदाधिकारी समितीतील सदस्यांना निर्णय घेताना विचारात घेत नाहीत, हे उदाहरणांसह निदर्शनास आणून दिले. समितीचे सभापती सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात.
पाठिंबा देऊन चूक केली का?
जिल्हा परिषदेत सत्तेवर येताना महाविकास आघाडीला स्थानिक आघाड्यांनीही पाठिंबा दिला आहे; पण या सदस्यांनाही विचारात घेतले जात नाही, निधी देताना दुजाभाव केला जातो. आम्ही पाठिंबा देऊन चूक केली का? अशा शब्दांत स्थानिक आघाडीतील या सदस्यांनी मुश्रीफ यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.
पदाधिकारी निरुत्तर
सदस्यांचे म्हणने ऐकल्यानंतर मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. सहा महिन्यांतच तुम्ही रंग दाखवले. तुमच्या काळात चांगल्या कामांची चर्चा होणार आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला. यावर पदाधिकारी निरुत्तर झाले.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री मुश्रीफ यांनी बैठकीचा इतिवृत्तान्त सांगितला. पदाधिकारी विश्वासात घेत नाहीत, पदाधिकाऱ्यांनी स्वनिधी जादा घेतला आहे, अशा तक्रारी होत्या. अन्याय दूर करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाविकास आघाडीबाबत चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदस्य हातात हात घालून काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.