गगनबावड्यातील पुरातत्त्व स्थळांचा एकात्मिक अभ्यास आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 06:56 PM2017-09-17T18:56:00+5:302017-09-17T19:09:53+5:30
गगनबावडा परिसरातील विविध पुरातत्त्वीय महत्त्वाची ठिकाणे एकत्रितपणे सादर करून सतीश लळीत यांनी पुरातत्त्वीय माहिती संकलनाचे मूलभूत काम केले आहे. आता या सर्व ठिकाणांचा एकात्मिक पद्धतीने, अधिक शास्त्रशुद्ध आणि सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ आणि राज्याचे माजी पुरातत्त्व संचालक डॉ. अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर, दि. १७: कोल्हापूर : गगनबावडा परिसरातील विविध पुरातत्त्वीय महत्त्वाची ठिकाणे एकत्रितपणे सादर करून सतीश लळीत यांनी पुरातत्त्वीय माहिती संकलनाचे मूलभूत काम केले आहे. आता या सर्व ठिकाणांचा एकात्मिक पद्धतीने, अधिक शास्त्रशुद्ध आणि सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ आणि राज्याचे माजी पुरातत्त्व संचालक डॉ. अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्व केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेली ‘एक्स्प्लोअरेशन्स इन महाराष्ट्र’ ही चौथी वार्षिक कार्यशाळा मुंबईत झाली. या परिषदेत १२ संशोधकांनी शोधनिबंध सादर केले. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी गगनबावडा तालुक्यातील मोरजाई परिसरातील पुरातत्व स्थळांबाबतचा 'आर्किआॅलॉजिकल साईटस् इन गगनबावडा विथ स्पेशल रेफरन्स टु मोरजाई प्लॅटु' हा निबंध सादर केला होता. त्याबाबत जामखेडकर यांनी हे मत व्यक्त केले.
कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे पुरातत्त्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेचे आयोजक व प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ज्ञ प्रा. डॉ. कुरूश दलाल आणि विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. मुग्धा कर्णिक यावेळी उपस्थित होत्या.
कोल्हापूरच्या पश्चिमेकडील गगनबावडा प्रदेशावर पाचव्या सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्य घराण्याची राजवट होती. या काळातील आणि नंतरच्या काळातील अनेक खुणा या भागात सापडतात. आसळज येथील वीरगळ समूह, रामलिंग-पळसंबे येथील चालुक्य शैलीतील एकसंध दगडी मंदिरे, सांगशी येथील हालिदेवी या राणीची पाचव्या शतकातील स्मारक शीला, मोरजाईच्या पठारावरील गुहा मंदिरात मोठ्या संख्येने असलेल्या सतीशिळा, मेगालिथ या सर्व ठिकाणांना भेट देऊन लळीत यांनी माहिती संकलित करून त्याचे सादरीकरण कार्यशाळेत केले.
मोरजाई परिसर सादरीकरणाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. सादरीकरणानंतर प्रश्नोत्तराच्या सत्रात डॉ. जामखेडकर म्हणाले, आतापर्यंत एखाद्या स्थळविशेषाबाबत लिहिले गेले आहे. पण एखाद्या परिसराचा ऐतिहासिक, पुरातत्वीय, स्थळविषयक अभ्यास करुन त्या परिसराचा एकात्मिकपणे विचार करण्याचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. या परिसरातील पळसंबे येथील मंदिरांना भेट देऊन मी त्यावर संशोधन व लेखन केले आहे. मात्र, लळीत यांनी ज्या पद्धतीने हा विषय मांडला, त्यानंतर याचे अधिक सखोल, शास्त्रशुद्ध संशोधन करण्याची जबाबदारी पुरातत्व संशोधकांची आहे.
या सर्व परिसराचा अशा पद्धतीने अभ्यास झाल्यास येथील इतिहासाचे नवे आयाम समोर येतील. तसेच या भागाच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास डॉ. जामखेडकर यांनी व्यक्त केला. डॉ. कुरुश दलाल यांनीही सादरीकरणाची प्रशंसा केली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. गर्गे यांनी 'महाराष्ट्रातील तोफा' या विषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध विवेचन केले. गडकिल्ल्यांवर इतस्तत: पडलेल्या ऐतिहासिक तोफांची माहिती संकलित करुन त्यांची त्या त्या किल्ल्यावर शास्त्रीय रितीने मोडणी करण्याचा उपक्रम हाती घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या व्यासपीठावर निवृत्त पुरातत्व संचालक डॉ. अरविंद जामखेडकर आणि सध्याचे पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे प्रथमच एकत्र आले. डॉ. गर्गे हे डॉ. जामखेडकर यांच्यानंतर या पदावर आलेले दुसरे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत.