पन्हाळ पंचायत समितीच्या स्थापत्य सहायकास अटक
By Admin | Published: February 14, 2015 12:48 AM2015-02-14T00:48:37+5:302015-02-14T00:48:46+5:30
तीन हजार लाचेची मागणी : ‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची कारवाई
कोल्हापूर / कोतोली : इंदिरा आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामाचा धनादेश काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून देण्यास तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. मारुती नामदेव चौगुले (वय ३३, रा. साखरी, ता. गगनबावडा) असे त्याचे नाव आहे.चौगुले याने लाच मागितल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने (नाव गोपनीय ठेवले आहे) पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतींकडे केली. त्यामुळे चौगुले याने रागाने ‘तुमचे पैसेही घेणार नाही व कामही करणार नाही’ असे सांगून प्रत्यक्षात लाच स्वीकारली नाही; परंतु, तरीही त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९९८, कलम ७, १२ अन्वये गुन्हा नोंद झाला व चौगुले याला अटक करण्यात आली.वाळवेकरवाडी (ता. पन्हाळा) येथे इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झाले. या घराच्या बांधकामाचा धनादेश काढण्यासाठी व कागदपत्रांची पूर्ततेसाठी दहा हजार रुपयांची लाच देण्यास वाळवेकरवाडी, कुंभारवाडी (ता. पन्हाळा) येथील ग्रामसेविका आस्मा मुल्लाणी यांनी प्रोत्साहन दिले. पण, प्रत्यक्षात तीन हजारांवर तडजोड झाली. पुढे तक्रारदाराने याबद्दल पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रार केल्यावर चौगुले व मुल्लाणी यांनी ‘तक्रारदारांना तुम्ही आमच्याविरुद्ध सभापती यांच्याकडे पैसे मागितलेबाबत का तक्रार केली? यापुढे तुमचे पैसेही घेणार नाही आणि तुमचे कामही करणार नाही,’ असे म्हणून लाच स्वीकारली नाही. दरम्यान, याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार पोलिसांनी कुंभारवाडी, वाळवेकरवाडी येथे सापळा रचून मारुती चौगुले याला पोलिसांनी अटक केली.