दोन लाचखोर अधिकाऱ्यांसह आर्किटेक्टला चार वर्षे शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:47 PM2020-02-27T16:47:27+5:302020-02-27T16:49:23+5:30
बिगरशेती करण्यासाठी चार लाखांची लाच घेणाऱ्या एका आर्किटेक्टसह दोन नगररचनाकार अधिकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
सातारा : बिगरशेती करण्यासाठी चार लाखांची लाच घेणाऱ्या एका आर्किटेक्टसह दोन नगररचनाकार अधिकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
नगररचनाकार आसाराम मोहनराव चंदनशिव (वय ५५, रा. कोथरुड, पुणे), सहायक नगररचनाकार संजय तानाजी फरांदे (वय ५४, रा. सदर बझार, सातारा), आर्किटेक्ट राहुल हणमंत भोकरे (वय ३२, रा. कमानी हौद, सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील २८ हजार चौरस मीटर जमीन बिगरशेती करण्याचा प्रस्ताव प्रकाश रघुनाथ माने (वय ५७, रा. शुक्रवार पेठ, फलटण) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव रेखांकन व अभिप्रायसाठी सहायक संचालक नगर रचनाकार कार्यालयात आलेला होता.
त्याप्रमाणे रेखांकन व कागदपत्रांची पुर्तता करून अभिप्राय सहायक संचालक यांच्याकडे सादर करण्यासाठी नगररचनाकार चंदनशिव याने २६ सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाश माने यांच्याकडे सात लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर चंदनशिवने सहायक नगररचनाकार फरांदेला भेटण्यास सांगितले. त्यानंतर फरांदेने माने यांना आर्किटेक्ट भोकरे यांच्याबरोबर चर्चा करण्यास सांगितले.
आर्किटेक्ट राहुल भोकरे यांनी पाच लाख रुपये लाच मागितली. अखेर तडजोडीनंतर चार लाख रुपये देण्याचे ठरले. १७ आॅक्टोबर २०१३ रोजी रात्री आठच्या सुमारास पोवई नाक्यावरील एका इमारतीमध्ये आर्किटेक्ट राहुल भोकरे याच्याकरवी चार लाखांची लाच घेताना चंदनशिव आणि फरांदेला रंगेहाथ पकडण्यात आले होते.
तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीवेळी एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आसाराम चंदनशिव, संजय फरांदे, राहुल भोकरे यांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.