आर्किटेक्चर म्हणजे नुसता देखावा नव्हे : शिरीष बेरी
By Admin | Published: November 5, 2014 10:10 PM2014-11-05T22:10:30+5:302014-11-05T23:39:36+5:30
इमारतीच्या रचनेत निसर्गाला सामावून घेतल ---थेट संवाद
इमारतीच्या रचनेत निसर्गाला सामावून घेतल ---थेट संवाद
े‘ही इमारत कोणी बांधली? हैदराबाद येथील लुप्तप्राय प्रजातीच्या संशोधक प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती डॉ़ ए़ पी़ जे़ अब्दुल कलाम यांनी हा प्रश्न व्यासपीठावरून विचारला़ माझ्या आर्किटेक्ट कारकिर्दीतील तो सर्वोत्तम सन्मान होता़ या रिसर्च संस्थेची वास्तुरचना मी केली होती़..’ सांगत होते कोल्हापुरातील ख्यातनाम आर्किटेक्ट शिरीष बेरी़़़ दक्षिण आशियातील आर्किटेक्चर क्षेत्रातील मानाचा ‘आर्किटेक्ट, डिझाईन अॅँड सेरा’चा ‘हॉल आॅफ फेम’ हा पुरस्कार यावर्षी बेरी यांना मिळाला़ इस्तंबूल येथे १५ नोव्हेंबरला हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे़ यानिमित्त ‘लोकमत’ने साधलेल्या संवादात शिरीष बेरी यांनी आर्किटेक्चर क्षेत्रातील अनेक पैलू उलगडले़
प्रश्न : आपलं आर्किटेक्चर क्षेत्रातलं पहिलं पाऊल कोणतं?
उत्तर : गगनबावडा येथे १९७४ ला बांधलेलं पंधरा हजार रुपयांचं साधं कौलारू घर हे माझं या क्षेत्रातील पहिलं पाऊल होतं़ अहमदाबाद येथील सीईपीटी येथून सहा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वडिलांनी आर्किटेक्चरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी मला अमेरिकेत जाण्यास सांगितले होते़; पण तिथे एअर कंडिशन्ड क्लासमध्ये राहून चाकोरीतील शिक्षण घेण्यापेक्षा मला स्वत:च्या कल्पकतेला वाव द्यायचा होता़ त्यामुळे वडिलांकडून १५ हजार रुपये घेऊन गगनबावडा येथे घर बांधलं़ सेंट झेवियर्स चर्च हा कोल्हापुरातील पहिला प्रकल्प़
प्रश्न : आर्किटेक्चर क्षेत्रात ‘बेरी स्पेशल’चे रहस्य काय आहे?
उत्तर : इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर यातील फरक मी पहिल्यापासून चांगल्या प्रकारे जाणून घेतला़ वास्तुरचना म्हणजे नुसता देखावा नव्हे. निसर्ग, माणूस आणि अभिरुची यांचा सुरेख संगम साधणारा हा व्यवसाय आहे़ या व्यवसायात मानवी जीवनमूल्यांचे महत्त्व मी नेहमीच अबाधित
ठेवले आहे़ त्याबरोबरच इमारतीच्या रचनेत निसर्गातील घटकांना सामावून घेतले आहे़ प्रत्येक इमारतीच्या रचनेत मानवाला निसर्गाच्या सहवासाचा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे़ एखाद्या ठिकाणी बांधकाम करताना तिथल्या आजूबाजूच्या नैसर्गिक घटकांना सामावून उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला़ म्हैसूर येथील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची इमारत हा याचा एक खास नमुना आहे़
या इमारतीभोवती सभोवताली दगडांचे जणू कुंपणच आहे़ निसर्गसन्मुख रचना हे आमच्या बांधकामाचे खास वैशिष्ट्य
आहे़
प्रश्न : आपल्या प्रमुख प्रकल्पांची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर : रहिवाशी संकुलाबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि संशोधन क्षेत्रांतील संस्थांची वास्तुरचना केली आहे़ हैदराबाद येथील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, पाचगणी येथील संजीवनी प्रायमरी स्कूल, पुणे येथील कॉम्पुटेशनल मॅथेमेटिक्स लॅबोरेटरी, म्हैसूर येथील एस़ डी़ एम़ इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, हैदराबाद येथील लॅबोरेटरी फॉर द कॉँझर्व्हेशन आॅफ एंडेंजर्ड स्पेसिस, कोल्हापूर येथील अॅस्टर आधार हॉस्पिटल हे प्रकल्प केले आहेत़ शिक्षण संस्था, संशोधन संस्था आणि हॉस्पिटलची वास्तुरचना करताना मानसशास्त्रीय घटकांचा विचार करून विविध रचना केल्या आहेत़ कामाच्या ठिकाणी उत्साह टिकावा, यासाठी निसर्गाचे दर्शन हा प्रमुख घटक विचारात घेतला आहे़ निसर्गसन्मुख रचनेचे भान संस्थांच्या बांधकाम रचनेतही जपले आहे़
प्रश्न : या क्षेत्रातील कॉर्पोरेट लॉबिंग आणि बिल्डिंग रेटिंगबद्दल काय सांगाल?
उत्तर : स्पर्धेमुळे या क्षेत्रातील कॉर्पोरेट लॉबिंंग वाढले आहे़ लॉबिंगसाठी पैसा खर्च होत असल्यामुळे गुणवत्तेशी व्यावसायिक तडजोड करीत आहे़ बिल्डिंग रेटिंगचेही फॅ ड वाढले आहे़ रेटिंगसाठी अमुक उत्पादनांचा आग्रह ग्राहकांच्या दृष्टीने खर्चिक ठरत आहे़ पैसे मिळविण्याचा धंदाच बिल्डिंग रेटिंगमुळे फोफावत आहे़ रेटिंगच्या उत्पादनाऐवजी हवा, प्रकाश मिळण्याच्या दृष्टीने वास्तुरचना केल्यास आपोआपच वीज, एअर कंडिशनर यांचा वापर कमी होईल़ कमी जागेतही विविध रचना करता येणे शक्य आहे. निसर्ग हा केंद्रस्थानी ठेवून रचना केल्यास खर्चात बचत होण्यास मदत होते.
प्रश्न : या क्षेत्रातील नवोदितांसमोरील आव्हाने कोणती?
उत्तर : दरवर्षी देशातून सुमारे
१५ हजार आर्किटेक्ट्स बाहेर
पडतात़ स्पर्धा प्रचंड आहे़ त्यामुळे गुणवत्तेमध्ये कॉम्प्रमाईज नको़ नावीन्यपूर्ण कल्पनांना आजही पुष्कळ संधी आहे़ वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील गर्दीचे प्रमाण वाढत
आहे. या क्षेत्रात नवनवे प्रयोग करण्यास वाव आहे. या व्यवसायाकडे कॉँक्रीट लाईन म्हणून पाहिल्यास उत्तम संधी आहेत. वास्तुरचना करताना निसर्ग आणि मानवी जीवनमूल्यांची सांगड घातल्यास उत्तम रचना तयार होतील.
- संदीप खवळे
देखावा हा वास्तुरचनेचा एक भाग आहे; पण वास्तू तयार करताना मानवाला निसर्गाचा सहवास कसा जास्तीत जास्त मिळेल, याकडे लक्ष देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. वास्तुरचना म्हणजे केवळ देखावा नव्हे, याचे भान नेहमीच जपले आहे. निसर्ग हा केंद्रस्थानी ठेवून रचना केल्यास खर्चात बचत होण्यास मदत होते. वास्तुरचना करताना मानवी मूल्यांचा अभ्यास तितकाच महत्त्वाचा असतो. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्थांची इमारतरचना करताना तेथील वातावरण आल्हाददायक राहण्याच्या दृष्टीने विविध निसर्गपूरक रचना करण्यावर नेहमीच भर दिला आहे. कॉँक्रीटच्या दुनियेत मानवी मूल्ये जपण्यावर भर आवश्यक आहे.