खासगी सावकारीला भिशीचा चाप
By admin | Published: February 16, 2015 12:28 AM2015-02-16T00:28:18+5:302015-02-16T00:29:12+5:30
वारकऱ्यांचा अर्थमेळा : १४ लाखांच्या भिशीचा खर्च फक्त २७७ रुपये
दत्तात्रय पाटील - म्हाकवे - खासगी सावकारीला चाप लावण्यासाठी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी त्यात यश येत नाही़ मात्र, हेच काम कागल तालुक्यातील बस्तवडेतील वारकऱ्यांच्या एका भिशीने केले आहे. स्वयंप्रेरणेतून १६ वर्षांपूर्वी सुरू झालेली २० हजारांची ही भिशी आज १४ लाखांवर पोहोचली आहे. विठ्ठल मंदिरात भिशी संकलन, तेथेच कर्जवाटप, कर्जाची वसुली आणि जमलेल्या भिशीचे वर्षअखेरीस वितरणही याच मंदिरात होते. विशेष म्हणजे तिचा व्यवस्थापन खर्च आहे केवळ २७७रुपये.
ना जामीन, ना तारण तरीही कर्ज देणाऱ्या या भिशीमुळे ग्रामस्थांच्या पायातील खासगी सावकारीच्या शृखंला तुटण्याला मदत झाली आहे. परिणामी परिसरातील गावांमधील जवळपास ८ खासगी सावकारांना सावकारी बंद करावी लागली आहे.
कागल तालुक्यातील बस्तवडे हे ३०० उंबरठ्यांचे गाव असून, १८६५ इतकी लोकसंख्या आहे. वारकऱ्यांनी १९९९ मध्ये गरीब, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी तसेच त्यांना बचतीची सवय लागावी म्हणूनच श्री विठ्ठल भिशी मंडळाची स्थापना केली. कार्तिक वारी ते पुढील कार्तिक वारी, असे या भिशीचे आर्थिक वर्ष आहे. ज्येष्ठ प्रवचनकार पां. रा. पाटील यांनी या पारदर्शी कारभाराने या भिशीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. भिशीची सभासद संख्या ८२ असली, तरी या सभासदांच्या हमीवर गावातील अन्य गरजूलाही कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे या भिशीची १०० टक्के कर्ज वसुलीची परंपरा आजतागायत कायम आहे. गावामध्ये शंभर ते सव्वाशे वारकरी नित्यनेमाने पंढरीची वारी करतात.
श्री विठ्ठल भजनी मंडळाला देण्यात येणारी देणगी अन् देवासमोर ठेवलेला एखादा रुपयाही भिशीच्या किर्दीला दररोज लिहिला जातो. तसेच विडा म्हणून देण्यात येणारा नारळही हे भक्तगण फोडून न खाता तो अल्प दरात विकून ते पैसेही या भिशीच्या किर्दीला नोंद करतात.
त्याचबरोबर कर्जदाराचा सत्कार कोणी करत नाही. मात्र, दरमहा व्याजाची रक्कम जमा करणाऱ्या कर्जदारांचा सत्कार केला जातो. त्यामुळे ग्रामस्थांना ही भिशी म्हणजे आर्थिक कुरुक्षेत्रावरील ढालच वाटू लागली आहे.
या भिशीतर्फे १६ वर्षांत तब्बल दीड कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. यापैकी एक रुपयाही थकबाकी नाही.
विठ्ठलावरील दृढ श्रद्धेमुळे कोणतेही तारण न घेता हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ही रक्कम कोणतीही कपात न करता मासिक दीड टक्के व्याज आकारून वर्षभरासाठी दिली जाते. या भिशीत रक्कम गुंतविणाऱ्या सभासदांना १३ टक्क्यांप्रमाणे व्याज दिले जाते. या व्याजातील काही रक्कम सभासद भिशीतच विविध उपक्रमांसाठी जमा करतात.
सामाजिक ऋण....
वर्षाकाठी १३ ते १४ लाख रुपये कर्जवाटपापोटी येणारे सर्व व्याज भिशीतील सभासदांसाठी वाटप न करता यातील २० ते २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम हरिनाम सप्ताह, संगीत भजन स्पर्धा, सत्कार, प्राथमिक शाळेस देणगी आदीसाठी खर्च केली जाते.
‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे...!’ हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा उपदेश अंगिकारत निरपेक्ष सेवाभावाने वारकरी अर्थकारणातही एक वेगळा आदर्श उभारू शकतात, याचे प्रात्यक्षिक ‘विठ्ठल भिशी’ने दाखविले आहे. भक्त परिवाराचे आर्थिक स्वावलंबन व त्यांची सावकारीतून मुक्तता करण्यासाठी भिशीचा हा प्रवास यापुढेही असाच चालू ठेवणार आहोत.
- ह.भ.प. मधुकर भोसले,
भिशीचे व्यवस्थापक.
वर्षभरासाठी नाममात्र १०१ रुपये मानधन, १८० पानी रजिस्टर, एक फाईल, एक पेन, प्रवासखर्च, टायपिंग व झेरॉक्स असा एकूण खर्च २७७ रुपये होतो. या अत्यल्प खर्चात तब्बल १४ लाखांची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात झाल्याचे भिशीचे व्यवस्थापक ह. भ. प. मधुकर भोसले सांगतात.