रब्बीचे क्षेत्र १२३७ हेक्टरने घटले, परतीच्या पावसाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:14 AM2020-01-08T11:14:31+5:302020-01-08T11:19:50+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.
अतिवृष्टी आणि महापुराने ऊसाचे मोठे नुकसान झाल्याने ते क्षेत्र रब्बीखाली येईल, असा अंदाज होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुरते वेळापत्रकच बदलून गेल्याचा परिणाम पेरणीवर दिसत आहे. आडसाल ऊसलागणीचे क्षेत्र वाढले असले तरी खोडवा क्षेत्रात घट झाली आहे.
जिल्ह्यात आॅक्टोबरपासून रब्बीच्या पेरण्या होतात. हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुक्यांत रब्बीच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या होतात. जिल्ह्याचे रब्बीचे पेरक्षेत्र ४० हजार हेक्टर आहे. त्यापैकी १८ हजार हेक्टर या दोन तालुक्यांतील आहे. उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात गहू, ज्वारी, हरभरा, मका, आदी पिके घेतली जातात.
रब्बीचा हंगाम मोठा असल्याने साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या केल्या जातात. मात्र यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यात महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढेल, असे वाटत असतानाच सप्टेंबर महिन्यात काहीशा थांबलेल्या पावसाने पुढे पाठच सोडली नाही.
आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले. पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्याने अगोदरच जमिनीतील ओल जास्त होती. त्यात परतीच्या पावसाच्या दणक्याने जमिनीला वाफसाच आला नाही. त्याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला. नोव्हेंबर महिन्यापासून रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या; पण त्याही दबकतच होत्या.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ४८ टक्केच पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने रब्बीचे क्षेत्र कमी झाले आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, भुदरगड तालुक्यात ज्वारीच्या, तर हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल तालुक्यांत गहू पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे चित्र आहे.
चारा पिकांत दुप्पट वाढ
यंदा महापुराने हातकणंगले, शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसला. उसाची पिके गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे चारा पिकांचे क्षेत्र वाढले. शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यांत सुमारे १५०० हेक्टर क्षेत्र हे चाऱ्याखालील आहे.
१४ हजार हेक्टरनी ऊसक्षेत्रात घट
यंदा महापुराने ऊस गेल्याने त्या ठिकाणी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उसाच्या आडसाल लागणी झाल्या. मात्र महापुरात विद्युतपंपांना वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शेतीला पाणीच मिळाले नाही. त्यात परतीचा पाऊस राहिल्याने पूर्वहंगामी लागणी होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा परिणाम पुढील २०२०-२०२१ या हंगामावर होणार असून लागण व खोडवा असा ४९ हजार ३३८ हेक्टरच ऊस उभा आहे.
रब्बी, ऊसलागणी घटण्याची कारणे
- साखर कारखान्यांचा हंगाम लांबल्याने ऊसक्षेत्रातील पेरण्या थांबल्या.
- नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळेना.
- महापुरात बहुतांश ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने पूर्वहंगामी उसाच्या लागणी होऊ शकल्या नाहीत.
तुलनात्मक उसाचे क्षेत्र हेक्टरमध्ये
वर्ष आडसाल पूर्वहंगामी सुरू खोडवा एकूण उभा ऊस
२०१९ १२,५०६ २२,१२९ ३,९५० २४,७०६ ६३,२९०
२०२० १७,८८० २०,४८६ १,४४१ ९,५३१ ४९,३३८