Kolhapur: यड्रावच्या ग्रामसभेत पुन्हा वाद, ऐनवेळचे विषय चर्चेत घेतले नसल्याने ग्रामस्थ संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:27 AM2024-01-24T11:27:46+5:302024-01-24T11:28:36+5:30
ग्रामसेवकांवर ग्रामस्थांचा रोष
यड्राव : येथील ग्रामसभेमध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग कायम करण्याच्या विषयावरून चर्चा रंगली असतानाच ऐनवेळी येणारे विषय चर्चेला घेतले जाणार नाहीत, असे सरपंचांनी सभेपुढे सांगितल्यावर ग्रामस्थांनी गोंधळाला सुरुवात केली. ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा न करता केवळ पंधरा मिनिटात सभा संपवून सत्ताधाऱ्यांनी सभागृह सोडले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना धारेवर धरले.
१५ डिसेंबर रोजी सरपंच यांनी रद्द केलेली ग्रामसभा मंगळवारी घेण्यात आली. गटविकास अधिकारी यांच्याकडून झालेल्या मार्गदर्शनानुसार सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांना सभा अध्यक्ष करण्यात आले. त्यास सर्वानुमते मंजुरी मिळाली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे या विषयावरून मागील ग्रामसभा कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत निर्णय होईपर्यंत त्या सभेतील झालेले ठराव जैसे थे ठेवण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. त्यावर ग्रामसेवकांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा विषय प्रलंबित ठेवला.
विषयपत्रिकेवरील इतर विषयांना ग्रामस्थांनी मंजुरी देत ऐनवेळचे विषय चर्चेसाठी घेण्याची मागणी केली. परंतु, सभाध्यक्ष सरपंच यांनी या सभेत ऐनवेळी आलेले विषय चर्चेला घेतले जाणार नाहीत, असे सांगितले आणि सभा संपल्याचे जाहीर केले. परंतु, ग्रामस्थांनी ऐनवेळेच्या विषयासाठी दिलेल्या लेखी अर्जावर चर्चा झालीच पाहिजे यासाठी आग्रह धरला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना चांगले धारेवर धरले.
परंतु, सभाध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केल्याने आता काही करता येत नाही, असे स्पष्टीकरण दिले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले अन् त्यांनी ग्रामसेवकांना धारेवर धरून प्रश्नांचा भडिमार केला व मनमानी कारभार चालणार नाही असा संताप व्यक्त केला.
ग्रामसेवकांवर ग्रामस्थांचा रोष
ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम न करता सत्ताधाऱ्यांचे नोकर म्हणून काम करीत आहात. तुम्ही आल्यापासून गावात अशांतता निर्माण झाली आहे. जनतेचा संयम सुटण्याआधी आपण गाव सोडून जावे, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने ग्रामसेवकांना ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागला.