विशाळगड जाळपोळ प्रकरण: दंगलखोरांना सोडले, मग पत्रकारांना का अडवता..? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:53 PM2024-07-17T12:53:20+5:302024-07-17T12:53:45+5:30

गजापूरला जाण्यास विरोध : तासभर अडवल्याने पोलिसांशी वाद

Argument between journalists and police for preventing them from going to Vishalgad | विशाळगड जाळपोळ प्रकरण: दंगलखोरांना सोडले, मग पत्रकारांना का अडवता..? 

विशाळगड जाळपोळ प्रकरण: दंगलखोरांना सोडले, मग पत्रकारांना का अडवता..? 

कोल्हापूर : शनिवार-रविवार दोन दिवस दंगलखोर विशाळगडावर जात होते तेव्हा त्यांना कुणीच अडवले नाही आणि आता पत्रकार दंगलग्रस्त लोकांना भेटायला जात असताना तुम्ही का अडवता, अशी संतप्त विचारणा कोल्हापुरातील सर्वच माध्यम प्रतिनिधींनी मंगळवारी पोलिस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केली. पांढरेपाणी येथे दुपारी त्यावरून सुमारे तासभर वाद झाला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर पोलिसांच्या तीनच गाड्या गजापूरकडे सोडण्यात आल्या.

दुपारी १२ वाजेच्या सुमारास इंडिया आघाडीचे नेते पांढरेपाणी येथे आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अडवले. शाहूवाडीचे प्रांत समीर शिंगटे, पोलिस निरीक्षक विजय घेरडे, स्वाती गायकवाड यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तिथे होता. प्रकरण संवेदनशील आहे आणि १४४ कलम लागू केल्याने तुम्हाला वर जाता येणार नाही, असे प्रांत शिंगटे यांनी सांगितले. त्यावर शाहू छत्रपतींनी मग दंगलखोर कसे गेले, रविवारी तुम्ही कुणाला असे अडवले होते का, अशी विचारणा केल्यावर ते निरुत्तर झाले. आम्ही लोकांशी संवाद साधायला निघालो आहे आणि जाणारच आहे, असे निक्षून सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घ्या असे सुचवले. त्यानंतर प्रांत शिंगटे यांनी फोनवरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी फक्त ५ लोकांनाच जाता येईल सांगितले. चर्चेतून १५ निवडक लोकांना जाण्याची परवानगी दिली. परंतु पत्रकारांना आम्ही सोडणार नाही..आम्हाला तसे वरून आदेश आहेत, असे सांगण्यात आले. 

परंतु हे ऐकायला पत्रकार तयार नव्हते. दंगलखोरांनी आमच्या पोटाला चाकू लावला तेव्हा तुम्ही कुठे होता.. घटनेचे व्हिडीओ साऱ्या देशभर व्हायरल झाले आणि आता आम्हाला का अडवता.. तुम्ही कसे अडवता ते अडवा म्हणून पत्रकार बॅरिकेड तोडून घुसले. त्यांना पोलिस अडवत होते. ही बाब इंडिया आघाडीच्या नेत्यांना समजल्यावर तुम्ही पत्रकारांना सोडणार नसाल तर आम्ही जाणार नाही, असा पवित्रा आर. के. पोवार, मेघा पानसरे, भारती पोवार, गिरीश फोंडे, सतीश कांबळे आदींनी घेतला. उदय नारकर यांनीही पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तरीही पोलिस ऐकायला तयार नव्हते. मग प्रांत शिंगटे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले. त्यांनी तीनच वाहने सोडणार अशी परवानगी दिली मग तासभर हुुज्जत घातल्यानंतर पत्रकारांना फक्त १५ मिनिटांत खाली निघून यायचे असे सांगत गजापूरकडे सोडण्यात आले.

Web Title: Argument between journalists and police for preventing them from going to Vishalgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.