उचंगी धरणावर धरणग्रस्त-पोलिसांमध्ये धुमश्चक्री, बंदी आदेश झुगारत काढला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 05:24 PM2022-04-25T17:24:31+5:302022-04-25T17:25:04+5:30
धरणावरील मशीनरी बंद केल्याशिवाय चर्चा करणार नाही अशी भूमिका कॉ. अशोक जाधव व कॉ. संजय तरडेकर यांनी घेतली. व रखरखत्या उन्हात रस्त्यातच ठाण मांडले. मोर्चातील वातावरण तणावपूर्ण होताच प्रांताधिकारी वसुंधरा बारवे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाल्या.
आजरा : उचंगी ता.आजरा येथील धरणग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी बंदी आदेश झुगारत धरणाच्या घळभरणीचे काम बंद करण्यासाठी मोर्चा काढला. पोलिसांनी रस्त्यातच मोर्चा अडविल्यानंतर धरणग्रस्त व पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विजयसिंह राठोड, तहसीलदार विकास अहिर यांनी उजव्या तीरावरील रस्ता, गायरान जमिनीचे सपाटीकरण व शिल्लक जमिनीच्या मोजणी बाबत लेखी पत्र दिल्यानंतर मोर्चा थांबवण्यात आला.
धरणग्रस्तांनी घळभरणीचे काम बंद करण्यासाठी धरण स्थळावर मोर्चा काढला. पाटबंधारेचे अधिकारी विजयसिंह राठोड यांची बदली झालीच पाहिजे, दादागिरी नही चलेगी, आधी पुनर्वसन मगच धरण अशा घोषणा दिल्या. मोर्चा वाटेतच अडविल्यानंतर धरणग्रस्त पोलिसांचे कडे तोडून मशीनरी बंद करण्यासाठी निघाले होते. यावेळी धरणग्रस्त व पोलिसांमध्ये जोरदार धुमचक्री झाली. पोलिसांनी काही धरणग्रस्तांना ताब्यातही घेतले. मात्र, धरणग्रस्त आक्रमक होताच त्यांना सोडून देण्यात आले.
धरणग्रस्तांची धरपकड करणाऱ्या अधिकाऱ्यांना महिलांनी शिव्यांची लाखोली वाहत थेट जाब विचारला. धरणावरील मशीनरी बंद केल्याशिवाय चर्चा करणार नाही अशी भूमिका कॉ. अशोक जाधव व कॉ. संजय तरडेकर यांनी घेतली. व रखरखत्या उन्हात रस्त्यातच ठाण मांडले. वातावरण तणावपूर्ण होताच प्रांताधिकारी वसुंधरा बारवे घटनास्थळी दाखल झाल्या.
प्रांताधिकारी बारवे यांनी ११० लोकांच्या १५० घरांसाठी ३ कोटी १८ लाख मंजूर झाले आहेत. त्याचे वाटपही सुरू झाले आहे असे सांगून धरणग्रस्तांना यादी दिली. उजव्या तीरावरील रस्त्याचे काम दोन मेपासून सुरू केले जाईल. गायरान जमिनीचे सपाटीकरण सुरूच आहे ते जूनअखेर पूर्ण केले जाईल. शिल्लक जमिनीच्या मोजणीबाबत भूमी अभिलेख कार्यालयात पैसे भरून तातडीने मोजणी करण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता विजयसिंह राठोड यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवले.