योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरुन आवाडे-हाळवणकर वादाला उकळी; डिजिटल फलकावर फोटो, निमंत्रण नसल्याने वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 01:39 PM2024-05-03T13:39:52+5:302024-05-03T13:40:36+5:30
अतुल आंबी इचलकरंजी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवेळी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे ...
अतुल आंबी
इचलकरंजी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवेळी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे फोटो असताना त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांचा फोटो वापरला नाही. तसेच दहा व्हीआयपी पाससह रितसर निमंत्रण मिळाले नसल्याच्या कारणावरून आमदार आवाडे हे सभेला उपस्थित राहिले नाहीत. याबाबत सुरेश हाळवणकर यांनीच डावलले असल्याच्या समजुतीतून आवाडेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या मानापमान नाट्याची चर्चा मात्र शहरात चांगलीच रंगली आहे.
गत विधानसभा निवडणुकीनंतर आमदार आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यापासूनच आवाडे-हाळवणकर यांच्यात वेळोवेळी कलगीतुरा रंगतो. त्यात खासदार धैर्यशील माने गटाचा सुरुवातीपासूनच हाळवणकरांकडेच ओढा आहे. ८ मार्चला झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या महिला मेळाव्यात उभारण्यात आलेल्या भव्य मंचावरील बॅनरवर आवाडे यांचा फोटो नव्हता. त्यामुळे आवाडेंनी बाहेरच्या मुख्य मार्गावर उंचच्या उंच कटआऊट उभारले. त्यामध्ये राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, मुख्यमंत्री, पंतप्रधान आदींचा समावेश होता. त्यानंतरही अनेकवेळा अशा अंतर्गत कुरघोड्या घडत राहिल्या.
यातून आमदार आवाडे यांचे पुत्र राहुल यांनी लोकसभेला शड्डू ठोकला. त्यातूनही पुढे जात आमदार आवाडे यांनी स्वत:चे नाव लोकसभेसाठी जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांची मनधरणी करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर आवाडेंनी लोकसभा लढविण्याचे रद्द करून महायुतीचे उमेदवार माने यांना पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी ताराराणी पक्षाच्यावतीने मतदारसंघात मेळावे घेऊन प्रचार सुरू केला.
त्यांच्या प्रचार सभांमध्ये उमेदवार माने, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्यासोबत आवाडे पिता-पुत्रांचे फोटो डिजिटल फलकांवर असतात, तर भाजपच्या प्रचार कार्यक्रमातील बोर्डावर वरील प्रमुखांसह आवाडेंऐवजी हाळवणकरांचे फोटो असतात. या शीतयुद्धातून वाढत गेलेल्या मतभेदाचा बुधवारच्या योगी आदित्यनाथ यांच्या सभेत भडका उडाला. मुख्य फलकावर आवाडे वगळता सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे फोटो वापरले होते.
त्याचबरोबर परिसरात लावण्यात आलेल्या लहान-मोठ्या डिजिटल फलक, जाहिराती यावरही आवाडेंचा फोटो नव्हता. तसेच महायुतीतील सर्व पक्षांचे ध्वज सभास्थळी होते. त्यामध्येही ताराराणीचा ध्वज नव्हता. या संपूर्ण प्रकारामुळे आवाडे गट नाराज झाला. प्रमुख कार्यकर्त्यांनी आवाडेंना सभेला जाण्यापासून रोखले. तसेच आवाडेंना अज्ञातस्थळी घेऊन जात त्यांचा फोनही बंद ठेवला.
या प्रकारानंतर अनेक प्रमुखांनी रात्री उशिरापर्यंत आमदार आवाडेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. गुरुवारी सकाळीही काही प्रमुखांनी भेटून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवाडेंनी नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण घडामोडीतून धैर्यशील माने यांच्या प्रचारावर नेमका कसा परिणाम होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
आवाडेंची प्रचार यंत्रणा थांबली
कार्यक्रमातील मान-अपमान नाट्यानंतर आवाडे गटाने आयोजित केलेले मेळावे, कॉर्नर सभा सध्या तरी स्थगित ठेवण्यात आले आहेत. गटातील पहिल्या फळीतील प्रमुख मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून, आमदार आवाडे यांच्याकडून सूचना मिळाली तरी ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे त्यांच्या गोटातून समजले.
सुरक्षिततेच्या कारणामुळे मंचावर मोजकीच उपस्थिती ठेवण्याच्या सूचना होत्या. त्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख, पदाधिकारी आणि बाहेरून आलेले नेते यांच्यासह स्थानिक प्रमुख यांच्या उपस्थितांच्या आकड्यांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ आले होते. त्यातूनही आवाडे गटाने दहा पास मागितले. मात्र, ते देणे अशक्य असल्याने त्यांना तीन पास दिले गेले होते. त्याचबरोबर प्रमुखांच्या भाषणामध्येही त्यांना वेळ दिली होती. - सुरेश हाळवणकर, माजी आमदार