हिजाबवरुन विद्यार्थी अन् शिक्षकामध्ये वाद, कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील घटना; तणावाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:25 PM2023-07-18T16:25:06+5:302023-07-18T16:27:01+5:30
वर्ग सुरु असताना त्याचे शिकवण्याकडे लक्ष नसल्याचे निदर्शनास येताच शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला हटकले
कोल्हापूर : शहरातील एका महाविद्यालयातील वर्गात बसलेला विद्यार्थी गोंधळ घालू लागल्याने शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला गोंधळाचा जाब विचारत त्याच्या गळ्यातील गमछा काढण्यास सांगितले. मात्र, त्याने वर्गातील मुलीचा हिजाब काढा मगच मी गमछा काढतो असे उत्तर दिल्याने तणाव निर्माण झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनांनीही संबधित महाविद्यालयात जात प्रशासनाकडून माहिती घेतली.
शहरातील एका महाविद्यालयातील बी.काॅमच्या पहिल्या वर्षात संबंधित विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सोमवारी तो पहिल्यांदाच कॉलेजमध्ये आला होता. वर्ग सुरु असताना त्याचे शिकवण्याकडे लक्ष नसल्याचे निदर्शनास येताच शिक्षकाने त्याला हटकले. त्याच्या गळ्यातील गमछा काढण्यास सांगितले. मात्र, त्याने याला विरोध केला. वर्गातील मुलींने घातलेला हिजाब काढा, मगच गमछा काढतो अशी भूमिका घेतली. यावरून काही विद्यार्थी व शिक्षकामध्ये वाद झाला.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महाविद्यालयात धाव घेतली. त्यांनी संबंधित शिक्षकांने माफी मागण्याची मागणी केली. दरम्यान, सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारे आमचे महाविद्यालय आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ठ जातीच्या-धर्माच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात येत नसल्याचे संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगतले.