वाद गल्लीतला; अख्खे शहर वेठीला
By Admin | Published: April 17, 2015 12:52 AM2015-04-17T00:52:33+5:302015-04-17T00:55:58+5:30
सदर बझार येथील प्रकार : आंबेडकर यांचा फलक फाडल्याच्या समजुतीने दुकानांवर दगडफेक; तीन एस.टी., दोन केएमटी बसेसचे नुकसान
कोल्हापूर : सदर बझार परिसरातील गाडगे महाराज विद्यामंदिर शाळेसमोर लावण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फलक अज्ञात समाजकंटकाने फाडल्याच्या समजुतीतून गुरुवारी संतप्त जमावाने ताराराणी चौकात येऊन सुमारे तासभर रास्ता रोको केला, तर ताराराणी चौक, ताराबाई पार्क परिसरात असलेल्या बॅँका, रुग्णालये, दुकाने, एस.टी. व ‘केएमटी’ बसेसवर तुफान दगडफेक केली. जमावाने संपूर्ण शहरातील दैनंदिन व्यवहार बंद पाडले.
मात्र, हा फलक महाविद्यालयातील वादावादीच्या कारणातून अज्ञात तरुणाने फाडल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संतप्त जमावाने शहर वेठीस धरून केलेल्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी अज्ञात २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १० जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. छायाचित्र फाडणाऱ्या तरुणांचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, सदर बाजार येथील गाडगे महाराज विद्यामंदिर शाळेसमोर लावण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सोबत स्थानिक कार्यकर्त्यांचा एक फलक बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात समाजकंटकाने फाडला होता. ही बाब गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता लक्षात आली. त्यामुळे परिसरातील कार्यकर्ते घटनास्थळी जमू लागले.
ताराराणी चौकात रास्ता रोको
जसा जमाव वाढेल, तशी संतापाची भावना वाढायला लागली. त्यानंतर जमावाने घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सुमारे चारशे ते पाचशे जणांचा जमाव तेथे जमला. त्यातील कोणी तरी रास्ता रोको करण्याचा विषय काढला आणि हा जमाव मोर्चाने ताराराणी चौकात पोहोचला. जाताना वाटेत सदर बझार येथे एका ‘केएमटी’ बसवर दगडफेक केली. ताराबाई पार्क येथे असलेले विजयराज हॉटेल, बॅँक आॅफ पतियाळा, विंग्ज ट्रॅव्हल्स अँड टूर्स यावर जोरदार दगडफे क करून त्यांचे फलक, काचेची तावदाने फोडली. जमावातील तरुण दगड, विटा फेकत होते. त्यामुळे पसिरातील सर्व दुकाने, बॅँका, हॉटेल तत्काळ शटर्स ओढून बंद ठेवली.
जमावाकडून जोरदार दगडफेक
मध्यवर्ती ताराराणी चौकात ११ वाजण्याच्या सुमारास जमावाने अचानक रास्ता रोको केला. रहदारीच्या वेळी अचानक रास्ता रोको झाल्याने संपूर्ण वाहतूक खोळंबली. रास्ता रोको सुरू असतानाच जमावातील काही तरुणांनी मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बॅँक आॅफ महाराष्ट्र, वीरशैव बॅँक, वासन आय केअर, इंडियन ओव्हरसीज बॅँक यांच्या कार्यालयांवर जोरदार दगडफेक केली. काही तरुणांनी दगड, विटा पोत्यात घालून आणल्या होत्या. त्यांनी ताराराणी चौकात दोन एस.टी. व दोन ‘केएमटी’ बसेसवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या. तसेच हॉटेल पंचशीलसमोर कर्नाटक एस. टी. महामंडळाची एक बस फोडली.
शहरातील व्यवहार बंद पाडले
या घटनेबाबत वृत्त कळताच शहराच्या अन्य भागातील दलित कार्यकर्तेही सदर बझार परिसरात धावले. त्यानंतर तरुणांचा जमाव हातात निळे ध्वज घेऊन घोषणा देत मध्यवर्ती बसस्थानक, स्टेशन रोड, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, भाऊसिंगजी रोड, चिमासाहेब चौक, सिद्धार्थनगर परिसरात गेला. जाता-जाता जमावातील तरुण वाटेतील दुकाने, व्यवसाय, बस वाहतूक, रिक्षा वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. कोल्हापूर बंद ठेवावे म्हणून तरुणांचा एक गट मोटारसायकलवरून शहरात फिरत होता. मोठ्या संख्येने दलित तरुण रस्त्यावर उतरल्यामुळे शहरातील व्यवहार भीतीपोटी बंद झाले.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
ताराराणी चौकात रास्ता रोको सुरू होता, त्यावेळी अप्पर पोलीसप्रमुख अंकित गोयल, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी तेथे गेले. त्यांनी नगरसेवक राजेश लाटकर व महेश जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी यावेळी, ज्यांनी कोणी फलक फाडून भावना भडकावण्याचा प्रयत्न केला, त्या समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सुमारे तासभर रास्ता रोको झाल्यानंतर आणि गोयल यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. रास्ता रोको मागे घेतल्यावर जमाव पुन्हा सदर बाजारात गेला. तेथेही घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी कोल्हापूर बंद ठेवण्यासाठी शहराकडे जाण्याचा आग्रह केला. दरम्यान, दुपारनंतर जमाव शांत झाला अन् तणावही निवळला. (प्रतिनिधी)
एस.टी.चे ४२ हजार रुपयांचे नुकसान
गुरुवारी आंदोलकांनी चार एस.टी. बसेसची तोडफोड केल्याने एस. टी. महामंडळाचे ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. दुपारी ११ वाजल्यापासून याचे पडसाद शहरात उमटले. यावेळी काही आंदोलकांनी एस. टी. बसेसना टार्गेट केल्याने कोल्हापूर विभागाच्या चार गाड्यांची तोडफोड करण्यात आली. ठिकठिकाणी रास्ता रोको करून एस.टी. बसेसची तोडफोड झाल्याने, एस.टी. प्रशासनाने काही मार्गांवरील वाहतूक काही वेळ बंद केली होती. यामध्ये कागल, सोलापूर, फलटण, गडहिंग्लज आगारांतील चार बसेसचा समावेश आहे.
पूर्व वैमनस्यातून प्रकार
याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी फलकावरील ज्या कार्यकर्त्याचे छायाचित्र फाडले होते त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचे कनाननगर येथे राहणाऱ्या तरुणाशी पूर्ववैमनस्य स्पष्ट झाले. दोघेही ताराबाई पार्कातील एका महाविद्यालयात शिकतात. सदर बझारमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याचे वाढदिवसाचे पोस्टर दोन महिन्यांपूर्वी महाविद्यालयाच्या समोर लावले होते. तेही फाडण्यात आले होते. कनाननगर येथील तरुणानेच फलकावरील कार्यकर्त्याचे छायाचित्र फाडल्याचे स्पष्ट झाले आहे.