कोल्हापुरात हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजाचे पोस्टर, संतप्त तरुणांनी केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:28 PM2022-12-15T15:28:37+5:302022-12-15T16:34:16+5:30
मात्र अद्याप या घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती.
उद्धव गोडसे
कोल्हापूर: शहरातील राजारामपुरीमधील एका बिर्याणी हाऊसमध्ये औरंगजेबाच्या वंशजाचे पोस्टर लावल्यावरुन वाद निर्माण झाला. यानंतर काही संतप्त तरुणांनी या बिर्याणी हाऊसमध्ये घुसून ते पोस्टर रस्त्यावर आणून फाडले. काल, बुधवारी (दि. १४) रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र अद्याप या घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती.
राजारामपुरीमध्ये 'बिर्याणी बाय किलो' हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. यावरुन काही तरुणांनी जाब विचारला. यानंतर हॉटेल कर्मचारी आणि तरुणांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर संतप्त तरुणांनी औरंगजेबाचा २० वा वंशज बहादूर शाह जफर यांच्या फोटोसह हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली.
कोण होते बहादूर शाह जफर?
बहादूर शाह जफर हे भारतातील मुघल साम्राज्याचे २० वे आणि अखेरचे बादशाह होते. १८५७ च्या उठावात त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना अटक करून म्यानमारच्या कैदखान्यात ठेवले होते. ते उर्दू शायर म्हणूनही प्रसिद्ध होते.