Kolhapur: खेळण्याचा वाद, साडेचार वर्षीय मुलाला नदीत दिले ढकलून; बालिकेवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:31 PM2024-01-22T12:31:05+5:302024-01-22T12:38:10+5:30
कोथळी येथील घटना: अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा
जयसिंगपूर : खेळण्याच्या वादातून साडेचार वर्षीय मल्लिकार्जुुनला कृष्णा नदीपात्रात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अकरा वर्षीय मुलीवर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. कोथळी (ता. शिरोळ) येथे शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला. त्या मुलीला आज, सोमवारी बालन्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रोहिणी सोळंके यांनी दिली.
वीटभट्टी हंगाम सुरू झाल्याने कर्नाटकातील अनेक कुटुंबे कोथळी (ता. शिरोळ) येथे आली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुले देखील आहेत. शुक्रवारी (दि. १९) लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिकार्जुन हा अचानक बेपत्ता झाला होता. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी तपास यंत्रणा राबविली.
वीटभट्टी चालकाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे अकरा वर्षीय मुलगी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीकडे घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. संशयावरुन तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने बालकाला नदीत ढकलून दिल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सोळंके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मी झाडाखाली बसली असताना मल्लिकार्जुनने मला दगड मारला होता, असे मुलीने सांगितले असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. खेळण्यातील किरकोळ वाद चिमुकल्याच्या जीवावर बेतला असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी कामगार मुलांसमवेत येतात; मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अकरा वर्षीय मुलगी पाचवीत शिकते. साडेचार वर्षांच्या मल्लिकार्जुनला नदीत ढकलून दिल्याचे तिने सांगितल्याने तिच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.