धक्कादायक! संपत्तीच्या वाटणीवरून वाद, जेवणात विष घालून सुनेने सासऱ्यास मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:40 AM2022-08-26T11:40:05+5:302022-08-26T11:42:51+5:30
मुलींनाही वारसा हक्काने वाटणी हवी आहे. या पार्श्वभूमीवर सून रूपाली हिने सासऱ्याच्या जेवणात विष घातले.
कागल (कोल्हापूर): बाचणी (ता. कागल) येथील अण्णाजी बापू जाधव (वय ७२) यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची सून रूपाली दत्तात्रय जाधव (वय ३४) हिला कागल पोलिसांनी काल, गुरुवारी अटक केली.
रूपाली हिने जेवणात विष घातल्याने आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार अण्णाजी यांच्या पत्नी शोभा जाधव यांनी कागल पोलिसांत दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली जाधव यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळल्याने कागल पोलिसांनी त्यांना अटक केली.
जेवणातून विषबाधेची घटना २७ जुलै रोजी घडली होती. सासू, सासरा, दीर व संशयित आरोपी सून असे सर्व जण एकत्र जेवण करीत असताना अण्णाजी यांना उलट्या सुरू झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. त्याचा ११ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. संपत्तीच्या वाटणीवरून कुटुंबात वाद सुरु आहे. मुलींनाही वारसा हक्काने वाटणी हवी आहे. या पार्श्वभूमीवर सून रूपाली हिने सासऱ्याच्या जेवणात विष घातले, अशी तक्रार पोलिसांत दिली होती. तपास सहायक पोलीस निरीक्षक मोनिका खडके करीत आहेत.