Kolhapur: क्रिकेट खेळताना वाद, इचलकरंजीत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:12 PM2024-05-14T12:12:04+5:302024-05-14T12:25:55+5:30
दोघे स्वत:हून पोलिसांत हजर
इचलकरंजी : येथील जिजामाता मार्केटमध्ये एका तरुणावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. सूरज अशोककुमार राठी (वय ३२, रा. नारायण पेठ) असे जखमी युवकाचे नाव आहे. घटनेनंतर दोघे हल्लेखोर स्वत:हून पोलिसांत हजर झाले. हा हल्ला क्रिकेट खेळताना निर्माण झालेल्या जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे. सोमवारी भरदिवसा झालेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली.
प्रणव मानकर व समर्थ राजकुमार जाधव अशी हल्लेखोरांची नावे आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सूरज राठी हा जिजामाता मार्केटमधील मुलतानमल बाबुलाल ॲण्ड कंपनी या कापड पेढीवर दिवाणजी म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो पेढी उघडण्यासाठी आला होता. पेढीचे शटर उघडत असतानाच पाठीमागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला. लाथा मारत सूरजला खाली पाडले आणि कोयत्याने डोक्यावर वार केला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने भेदरलेल्या सूरज जीव वाचविण्यासाठी समोरच असलेल्या बाबुलाल चोपडा यांच्या माताजी या कापड पेढीत घुसला. त्याचा पाठलाग करत हल्लेखोरही पेढीत घुसले. या ठिकाणी त्याच्यावर पुन्हा कोयत्याने वार केले. यावेळी वार चुकवत सूरज हा पेढीतील बाथरूममध्ये शिरला. दरवाजा लावून घेतल्यामुळे तो बचावला.
सूरज याच्या डोक्यात, दोन्ही हातांवर व खांद्यावर वार झाल्याने पेढीवर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळीच कोयता टाकून हल्लेखोरांनी पलायन केले. नागरिकांनी राठी यास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक लॅब पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. घटनेनंतर संशयितांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर राहून कबुली दिली.
घटनास्थळावरील चित्र
माताजी पेढीवर मोठा कोयता, एक घड्याळ, अंगठी, कानातील बाली आणि मोबाइल पडल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी सर्व वस्तू जप्त करून पंचनामा केला.