अरिफ पठाण मित्र मंडळाची रिक्षा सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:30 AM2017-08-26T00:30:49+5:302017-08-26T00:31:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हिंदु सणवारात कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती देणारे अनेक अनुभव आहेत. असेच एक रिक्षाचालक अरिफ पठाण हे गेल्या पाच वर्षांपासून भाविकांच्या घरी मोफत गणेशमूर्ती पोहोच करतात.
या उपक्रमात सातत्य राखत त्यांनी यंदाही सकाळी ७ वाजल्यापासून गंगावेश परिसरातून गणेशमूर्ती नेण्यासाठी येणाºया भाविकांना मोफत घरपोच सेवा दिली. दिवसभरात २५ रिक्षांतून या रिक्षाचालकांनी ७५० हून अधिक गणेशमूर्ती भक्तांच्या घरी मोफत व सुखरूप पोहोचविल्या. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कणेरकरनगर, पिराचीवाडी, खुपिरे (ता. करवीर), शिंगणापूर, सुभाषनगर, संभाजीनगर, राजारामपुरी, रूर्ईकर कॉलनी, सुर्वेनगर, उचगांव, आर. के. नगर आदी परिसरातील गणेशभक्तांना ही सोय पठाण यांच्यासह २५ चालकांनी मोफत दिली.
ही सेवा विकी देसाई, राजकुमार ढवळे, शेखर कोळेकर, राजू पाटील, सचिन केळुसकर, जयंत जाधव, प्रवीण पवार, अमित खाडे, विलास लोहार, प्रदीप जाधव, सूरज शेख, बाळासाहेब पाटील, प्रकाश पवार, सुरेश करले, दीपक पोवार, प्रशांत खाडे, दिलीप कोठावळे, जयसिंग खांडेकर, जीवा खांडेकर, बाळ महाराज पाटील, सुहास शेटे, सतीश सातारकर, विकास धाडणकर, आदींनी ही सेवा दिली. सर्वधर्मियांचे देव एकच असतात. त्यातून मला ही सेवा करण्याची संधी माझ्यासाठी ईश्वरी सेवाच आहे, अशी कबुलीही पठाण यांनी दिली.