राहुल चव्हाणच्या खुनाची टीप दिल्याच्या रागातून अमोल भास्करवर सशस्त्र हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:27 AM2021-09-24T04:27:41+5:302021-09-24T04:27:41+5:30
कोल्हापूर : जवाहरनगरात गेले काही वर्षे शांत असलेल्या गुंडांच्या पुन्हा टोळ्या सक्रिय झाल्या. राहुल चव्हाणच्या खुनासाठी टीप दिल्याच्या रागातून ...
कोल्हापूर : जवाहरनगरात गेले काही वर्षे शांत असलेल्या गुंडांच्या पुन्हा टोळ्या सक्रिय झाल्या. राहुल चव्हाणच्या खुनासाठी टीप दिल्याच्या रागातून आठ जणांनी थरारक पाठलाग करून अमोल भास्करवर सशस्त्र हल्ला केला. गुंडांनी तलवार, गज, कोयता लोखंडी पाईप आदी हत्यारांचा वापर केला. शिवाजी पेठ, महाद्वार रोड ते वाघबीळ रस्त्यावर बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. शिवाजी पूल ते वाघबीळ रस्त्यावर त्याच्या मोटारीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी संशयित रवी शिंदे यांच्यासह आठ जणांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला.
गुन्हा नोंद झालेल्यांची नावे अशी : प्रदीप कदम, संदीप मोतीराम गायकवाड, रवी शिंदे, जावेद सय्यद, सागर जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय कदम, अजित माने (सर्व रा. जवाहरनगर).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवाहरनगरात अमोल महादेव भास्कर हा राहतो. तो बुधवारी सायंकाळी शिवाजी पेठेत आपल्या आलिशान मोटारीतून गेला होता. भास्कर याने आरसी ग्रुपचा प्रमुख राहुल चव्हाण याच्या खुनासाठीची टीप दिली आणि त्याच्या कुटुंबीयाने रिअल इस्टेट व होलसेल किराणा व्यापारात प्रगती केल्याच्या रागातून संशयित रवी शिंदे, प्रदीप कदम, संदीप गायकवाड, जावेद सय्यद, सागर जाधव, प्रकाश कांबळे, अक्षय कदम, अजित माने यांनी तलवार, कोयता, गज, लोखंडी पाईप घेऊन शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम परिसरात भास्कर याच्यावर हल्ला केला. शिवाजी पूल ते वाघबीळ रस्त्यावर हल्लेखोरांनी हत्याराने त्याच्या मोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर शिवागीळ, दमदाटी करत धमकीही दिली. अशी फिर्याद मध्यरात्री अमोल भास्करने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार संबंधित आठ संशयितांवर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे, उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे, उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत.
जवाहरनगरात बंदोबस्त
घटना महाद्वार रोड व शिवाजी पुलानजीक घडली असली तरीही त्याचे पडसाद जवाहरनगरात दोन गुंडांच्या टोळ्यात उमटण्याची दाट शक्यता आहे. खबदारीचा उपाय म्हणून जवाहरनगरात बुधवारी रात्रीपासूनच कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.