काळबा गायकवाडसह पाचजणांच्या घरांवर सशस्त्र हल्ला; तीन जखमी-: परिसरात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:16 AM2019-10-04T01:16:22+5:302019-10-04T01:17:53+5:30

गेल्यावर्षी महाडिक माळ येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतील गोळीबारात काळबा ऊर्फ विजय गायकवाड हा संशयित जखमी झाला होता. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी दुपारी टेंबलाई देवीची ‘कोहाळ पंचमी’ यात्रा होती. परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती.

Armed attack on five houses including Kalaba Gaikwad; Three injured | काळबा गायकवाडसह पाचजणांच्या घरांवर सशस्त्र हल्ला; तीन जखमी-: परिसरात दहशत

कोल्हापुरातील टेंबलाई झोपडपट्टीत अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यानंतर परिसरातील महिलांनी दहशतीच्या छायेखाली वावरत राजारामपुरी पोलीस ठाणे गाठले. तेथेही या महिलांनी कारवाईसाठी ठाण मांडले होते.यावेळी परिसरातील साहित्याची मोडतोड केली होती.

Next
ठळक मुद्दे रेल्वे फाटक झोपडपट्टीत भरदिवसा प्रकार

कोल्हापूर : येथील टेंबलाई रेल्वे फाटक झोपडपट्टीमध्ये अज्ञात १५ ते १७ हल्लेखोरांनी हातात नंग्या तलवारी, काठ्या, दगड घेऊन काळबा गायकवाड याच्या घरासह एकूण पाच घरांवर सशस्त्र हल्ला केला. हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी दुपारी झालेल्या हल्ल्यानंतर झोपडपट्टीतील भीतीने गर्भगळीत झालेल्या महिलांनी सायंकाळी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात ठाण मांडून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली; पण रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

गेल्यावर्षी महाडिक माळ येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतील गोळीबारात काळबा ऊर्फ विजय गायकवाड हा संशयित जखमी झाला होता. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी दुपारी टेंबलाई देवीची ‘कोहाळ पंचमी’ यात्रा होती. परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक सुमारे १५ ते १७ जण हातात नंग्या तलवारी, काठ्या, दगड घेऊन टेंबलाई रेल्वे फाटक झोपडपट्टीत शिरले. त्यांनी अनेक घरांवर दगडफेक केली. अरुंद गल्लीत घुसून अनेकांच्या दारावर तलवारीचे घाव घातल्याने दरवाज्यांची तोडफोड झाली. काही घरात घुसून साहित्यांची मोडतोड केली. त्यानंतर हे हल्लेखोर निघून गेले. सुमारे तासभरानंतर पुन्हा त्याच हल्लेखोरांनी पुन्हा सशस्त्र हल्ला केला.

यामध्ये सुनीता विजय पांढरे यांच्या किराणा माल दुकानातील साहित्य विस्कटले, तर काळबा ऊर्फ विजय गायकवाड यांच्या घरासह सोनाबाई वसंत कटके, वंदना महादेव कुरणे, नरेंद्र तमायचेकर यांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्यांची मोडतोड केली. सुमारे तासभर हा हल्लेखोरांचा धुमाकूळ सुरू होता. हल्लेखोरांनी प्रत्येकाच्या दारावर पुन्हा दगड टाकले, दारातील घागरी, सायकलींची मोडतोड केली. हल्लेखोरांनी परिसरात ब्रीजखाली असलेल्या मंडळाच्या बेंचचेही मोडतोड केली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हल्ल्यात जखमी हल्लेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दादू कसबेकर (२८), अरुणा आखाडे (३४), शमा रियाज शेख (४८) हे तिघे जखमी झाले.

  • हल्लेखोरांच्या भीतीने काळबा गायकवाड यांच्या घरात त्याची मुलगी अश्विनीसह परिसरातील पाच-सहा मुली लपून बसल्या होत्या. हल्लेखोरांनी त्यांच्या घराच्या दारांवरही तलवारीचे घाव घातले. त्यावेळी अरुणा आखाडे या महिलेने धाडसाने पुढे येऊन हल्लेखोरांना विरोध केला; पण हल्लेखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे सशस्त्र हल्ला होऊनही पोलीस मात्र यात्रा बंदोबस्तात व्यस्त होते, फक्त दोनच पोलिसांनी परिसरात फेरफटका मारून निघून गेले.
  • पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांचा ठाण

हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर तेथील भयभीत झालेल्या महिलांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडला.
कारण गुलदस्त्यात

  • हल्ला कोणी केला? कशासाठी केला? याबाबत या परिसरातील महिला संभ्रमावस्थेत होत्या. हल्ला करण्यामागचे ठोस कारणही सांगता येत नव्हते.


कोल्हापुरात रेल्वे फाटक उड्डाणपुलानजीक टेंबलाई झोपडपट्टीत अज्ञात हल्लेखोरांनी अनेक घरांवर सशस्त्र हल्ला केला.

Web Title: Armed attack on five houses including Kalaba Gaikwad; Three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.