सशस्त्र सेना ध्वज दिन : मशिन गन्स, रॉकेट लॉंंचर पाहून कोल्हापुरातील विद्यार्थी अचंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:27 AM2018-12-07T11:27:06+5:302018-12-07T11:44:49+5:30
एरवी चित्रपटामध्ये पहायला मिळणाऱ्या मशिन गन्स, रॉकेट लॉंचर प्रत्यक्ष पहायला मिळाल्याने कोल्हापुरातील १00 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी अचंबित झाले. निमित्त होते खासदार संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या सशस्त्र सेना ध्वज निधी दिनाचे.
कोल्हापूर : एरवी चित्रपटामध्ये पहायला मिळणाऱ्या मशिन गन्स, रॉकेट लॉंचर प्रत्यक्ष पहायला मिळाल्याने कोल्हापुरातील १00 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी अचंबित झाले. निमित्त होते खासदार संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या सशस्त्र सेना ध्वज निधी दिनाचे.
छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनने १0९ टेरिटोरयिल आर्मी मराठा लाईट इन्फ्रंटीच्या सहकार्याने सैन्यदलातील विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन येथे भरविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी या शस्त्रास्त्रांची माहिती घेतली.
यावेळी तिरंगी फुगे सोडून संभाजीराजे, संयोगिताराजे, परमजित कौर, कर्नल दिलीपसिंग मंडलिक, ले.कर्नल मिलिंद शिंदे आदिंनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले.
यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांंचा गौरव करण्यात आला. तसेच या सर्वांना एनडीएची अभ्यास सहल घडवून आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सैन्य दले आणि जनता यांच्यातील अंतर कमी व्हावे यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
भारतीय सशस्त्र दलांना या शस्त्रास्त्रांचा उपयोग आपल्या सीमांचे रक्षण करण्याकरिता होतो. ती शस्त्रास्त्रे शालेय विद्यार्थ्यांना टेंबलाई हिल येथील १०९ टेरिटोरयिल आर्मी मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन येथे पहायला मिळाली. या प्रदर्शनामध्ये ठेवलेली लष्करी शस्त्रास्त्रे ही प्रमुख्याने लहान श्रेणीतील शस्त्रे आहेत आणि त्यांची क्षमता प्रतिबंधित आहे.
मध्यम मशीन गन्स, रॉकेट लॉंचर्स, आॅटोमेटीक ग्रेनेड लॉंचर्स आणि अँटी टँक गाईडेड मिसाईल लॉंचर्स आणि इतर अनेक लहान शस्त्रे, संपर्क साधने आणि रात्रीच्या अंधारात दिसायला मदत करणारी साधने अशी मुलांना रस वाटेल अशी ही शस्त्रास्त्रे आहेत.