गंजीमाळ परिसरात सशस्त्र गुंडांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:27+5:302021-01-02T04:20:27+5:30
कोल्हापूर : गंजीमाळ परिसरात गुरुवारी दुपारी गुंडांच्या सशस्त्र टोळक्याने दुचाकीवरून येऊन दोन घरांवर हल्ला करून प्रापंचिक साहित्याची तसेच परिसरातील ...
कोल्हापूर : गंजीमाळ परिसरात गुरुवारी दुपारी गुंडांच्या सशस्त्र टोळक्याने दुचाकीवरून येऊन दोन घरांवर हल्ला करून प्रापंचिक साहित्याची तसेच परिसरातील वाहनांची मोडतोड केली. या हल्ल्यात सहाजण जखमी झाले. भरदिवसा हातात तलवारी घेऊन अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली व दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आला आहे. हल्ला करून पळून गेलेल्या गुंडांची एक बुलेट घटनास्थळी जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे : मालूबाई संभाजी टिकपुर्ले (वय ५१), नंदाबाई राजू कांबळे (४०), राजू कांबळे (४०), यश कांबळे (१६, सर्व रा, गंजीमाळ, आंबेडकर कमानीनजीक), विकी भीमराव कांबळे (३०) त्याची पत्नी प्रिया कांबळे (३० दोघेही रा, लक्ष्मीपुरी).
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, टिंबर मार्केट परिसरातील गंजीमाळ येथील अमित टिकपुर्ले व त्याची बहीण नंदा कांबळे हे स्वतंत्रपणे राहतात. अमित टिकपुर्ले ऊर्फ पैलवान व वारे वसाहतमधील कुरडे यांच्यात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. त्यातून गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास वारे वसाहतीतील आठ ते दहा युवकांनी हातात तलवारी, काठ्या घेऊन दुचाकीवरून येऊन गंजीमाळ परिसरातील आंबेडकर कमानीनजीक येऊन धुडगूस घातला. गुंडांनी परिसरातील वाहनांची मोडतोड केली. बहुतांश घरांच्या दारातील पाण्याच्या टाक्या फोडल्या. राजू कांबळे व अमित टिकपुर्ले यांच्या घरांत घुसून टीव्हीसह प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली. घरांच्या दरवाजांचीही मोडतोड केली. दोन्ही घरांतील सहाजणांना बेदम मारहाण केली. दोघांना मुकामार लागला असून इतरही जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. हल्लेखोरांचा या परिसरात तासभर धुमाकूळ सुरू होता. हल्लेखोर पळून जाताना नागरिकांनी त्यांपैकी एकाला पकडले. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पकडलेल्या हल्लेखोरास नागरिकानी पोलिसांच्या स्वाधीन केले.
वाहनांचे नुकसान
माजी नगरसेवक पांडुरंग आडसूळ यांची मोटारकार, उमेश मधाळे यांची रिक्षा, ऋषिकेश उमेश शिंदे, इम्रान नजीर शेख, भीमराव कांबळे, सुभाष तुकाराम कांबळे यांच्या चार दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले.
(फोटो पाठवत आहे..)