कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:52 PM2017-10-16T17:52:20+5:302017-10-16T18:02:02+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती सोमवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
कोल्हापूर , दि. १६ : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती सोमवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
जिल्ह्यांतील ४७२ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी ज्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर कार्यकर्ते जल्लोषात गुलाल उधळण्याची शक्यता आहे. त्यातून विरोधी गटाबरोबर वाद होण्याची शक्यता असल्याने विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
निकालानंतर गाड्यांचे सायलेन्सर काढून दंगामस्ती करणाºया कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. जिल्ह्यातील गावागावांत पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत, तर ४७ संवेदनशील गावांमध्ये राज्य राखीव दलाचे जवान तळ ठोकून आहेत. अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक असे सुमारे तीन हजार पोलीस जिल्ह्यांवर लक्ष ठेवून असल्याचे पोलीस अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.
वाहतूक मार्गात बदल
करवीर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींची मतमोजणी कसबा बावडा, रमणमळा शासकीय धान्य गोदाम येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मुख्य टपाल कार्यालय ते मतमोजणी ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
महावीर कॉलेज ते कसबा बावड्याकडे जाणारी सर्व वाहने जिल्हाधिकारीकार्यालय, शासकीय विश्रामगृह मार्गे ये-जा करतील. कसबा बावड्याकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहने ही भगवा चौक, धैर्यप्रसाद हॉल मार्गे ये-जा करतील, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.