कोल्हापुरातील बालिंगा येथे ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा, गोळीबारात दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:23 AM2023-06-09T11:23:44+5:302023-06-09T11:24:16+5:30
सुमारे तीन किलो दागिने लंपास
कोल्हापूर/कोपार्डे : बालिंगा (ता. करवीर) येथे बस स्टॉपजवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे पावणेदोन कोटींचे तीन किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि. ८) दुपारी दोन ते सव्वादोन या वेळेत घडली.
दरोडेखोरांसोबत झालेल्या झटापटीत ज्वेलर्सचे मालक रमेश शंकरजी माळी (वय ४०, सध्या रा. बालिंगा, मूळ रा. राजस्थान) आणि त्यांचा मेहुणा जितू मोड्याजी माळी (३०, रा. बालिंगा) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेदरम्यान दुकानात असलेला १३ वर्षांचा मुलगा पीयूष रमेश माळी हा प्रसंगावधान राखून स्ट्राँगरूममध्ये लपून बसल्याने सुदैवाने बचावला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे राजस्थान येथील माळी कुटुंबीय बालिंगा येथे स्थायिक झाले असून, त्यांचे कात्यायनी ज्वेलर्स हे दुकान बस स्टॉपपासून जवळच आहे. गुरुवारी दुपारी दुकानाचे मालक रमेश माळी त्यांचा मेहुणा जितू आणि मुलगा पीयूष हे तिघे दुकानात होते. दोनच्या सुमारास दोन व्यक्ती दुकानात आल्या. यातील एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते, तर दुसऱ्याने रुमालाने चेहरा झाकला होता. आत शिरताच त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सर्व दागिने दोन पिशव्यांमध्ये भरण्यास सांगितले.
दुकानाचे मालक माळी यांनी प्रतिकार करताच एका दरोडेखोराने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्याने पिस्तुलाच्या गोळ्या झाडून दुकानातील कपाटांच्या काचा फोडल्या. सुमारे ४० ट्रेमधील तीन किलो दागिने आणि दीड लाखाची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. दोन दुचाकींवरून चौघे गगनबावड्याच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
यावेळी झालेल्या झटापटीत रमेश यांच्या पोटात आणि पायाला गोळी लागल्याने ते जमिनीवर कोसळले. बाहेर पडणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला रोखण्याचा प्रयत्न जितू माळी यांनी केला. मात्र, दरोडेखोराने डोक्यात काचेचा तुकडा मारल्याने ते जागीच कोसळले. बाहेर येताच दरोडेखोरांनी गोळ्या झाडून दुकानाच्या काचा फोडल्या. त्यानंतर लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत ते दुचाकीवरून भरधाव वेगात निघून गेले.
आसपासच्या दुकानांमधील नागरिकांनी तातडीने याची माहिती करवीर पोलिसांना देऊन जखमींना उपचारासाठी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या दोन पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपअधीक्षक संकेत गोसावी, करवीरचे निरीक्षक अरविंद काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिकचे पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाने दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फारसे काही हाती लागले नाही.
लपून बसल्याने मुलगा बचावला
दरोडेखोरांनी झटापट करताच दुकानातील भेदरलेला मुलगा पीयूष हा कोपऱ्यातील स्ट्राँगरूममध्ये जाऊन लपला. दरोडेखोर दुकानाबाहेर पडल्यानंतरच तो खोलीतून बाहेर आल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही. तसेच स्ट्राँगरूममधील चांदी आणि रोकड सुरक्षित राहिली. मात्र, या घटनेने तो प्रचंड घाबरला होता. त्यानेच घटनेची सर्व माहिती पोलिस अधिकाऱ्यांना सांगितली.