माडग्याळात सशस्त्र दरोडा
By Admin | Published: February 25, 2017 12:04 AM2017-02-25T00:04:45+5:302017-02-25T00:04:45+5:30
पाच ठिकाणी धुमाकूळ : पोलिसांवर दगडफेक; महिलांना मारहाण; अडीच लाखांचा ऐवज लंपास
माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथे गुरुवारी रात्री आठ जणांच्या टोळीने पाच ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकून, महिलांना कोयता व सत्तूरचा धाक दाखवून मारहाण केली. रोकड, सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज यावेळी लंपास करण्यात आला. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण टोळीने पोलिसांवर दगडफेक करून पलायन केले. माडग्याळ पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी भीतीने संपूर्ण रात्र जागून काढली.
जत-उमदी रस्त्यावर हनुमान स्टिल ट्रेडर्स या दुकानाच्या गेटची जाळी तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात रामा चौधरी झोपले होते. चोरट्यांनी त्यांना सत्तूरचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील दहा हजाराची रोकड व मोबाईल काढून पलायन केले. चौधरी यांनी आरडाओरडा करताच चोरटे त्यांच्यावर दगडफेक करीत अंधाराचा फायदा घेत पळून गेले. दुसऱ्या घटनेत बसव्वा महादेव माळी ही महिला घरासमोर अंगणात झोपली होती. ही संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व लोखंडी पेटीतील सोन्याची बोरमाळ व नऊ हजाराची रोकड लंपास केली. तेथून चोरट्यांनी कृष्णा सावंत यांच्या घराकडे मोर्चा वळविला. सावंत कुटुंबही घराला कुलूप लावून अंगणात झोपले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सावंत यांची डाळिंब उत्पादनाची ८२ हजाराची रोकड व मोबाईल लंपास केला. चोरट्यांच्या हालचालींचा आवाज ऐकून सावंत यांची पत्नी जागी झाली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर वस्तीवरील सर्व लोक जागे होताच चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक करुन तेथूनही पळ काढला.
चौथ्या घटनेत चोरट्यांनी केशव सावंत यांच्या दार उघडे असलेल्या घरात प्रवेश करून टेबलवर ठेवलेला मोबाईल लंपास केला. घरातील लोक झोपेतून उठण्यापूर्वी तेथून पळ काढला. ते अंकलगी रस्त्यावर डॉ. रवींद्र बुधिहाळ यांच्या रुग्णालयाजवळ जमा झाले. तिथे ते कन्नड भाषेत बोलत होते. त्यांचा आवाज ऐकून तेथील घरातील एक महिला घराबाहेर येताच चोरट्यांनी तिला सत्तूरचा धाक दाखवित जिवे मारण्याची धमकी दिली. पण तिच्या घरात काहीच मिळाले नाही. त्यामुळे तिला घरात कोंडून बाहेरून कडी लावली. या महिलेने मोबाईलवरून डॉ. बुधिहाळ यांना याची माहिती दिली. डॉ. बुधिहाळ तिथे येण्यापूर्वीच चोरट्यांनी रुग्णालयातील ४५ हजाराची रोकड, वाहन चालविण्याचा परवाना, एटीएम कार्ड असा ऐवज घेऊन पलायन केले. (वार्ताहर)
------------------------
दुचाकी सापडल्या
चोरट्यांचा शोध घेताना शुक्रवारी सकाळी पोलिसांना ओढापात्रात दोन दुचाकी सापडल्या आहेत. एका दुचाकीवर खडूने नंबर घातला आहे, तर दुसऱ्या दुचाकीला क्रमांकच नाही. दरोडेखोरांच्या या दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांचा पाठलाग सुरु झाल्यानंतर त्यांनी त्या ओढापात्रात सोडून पलायन केले. कदाचित या दोन्ही दुचाकी चोरीच्या असाव्यात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांकडून पाठलाग
दरोडा पडल्याचे वृत्त समजताच पोलिस चौकीतील पोलिसांनी खासगी वाहन घेऊन चोरट्यांचा पाठलाग केला. चोरट्यांकडे दोन दुचाकी होत्या. पोलिसांचा पाठलाग सरू झाल्याचे समजताच चोरटे अंधारात लपून बसले. त्यांनी वाहनावर जोरदार दगडफेक केली. पोलिसांकडे संरक्षणार्थ काहीच नव्हते. हीच संधी साधून चोरटे पळून गेले. त्यानंतर जत तालुक्यात पोलिसांनी पहाटेपर्यंत नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध सुरू ठेवला होता, पण ते सापडले नाहीत.
तिघेजण जखमी : चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत रामा चौधरी, कृष्णा सावंत, त्यांची पत्नी शेवंता, मुलगा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. पाच ठिकाणी दरोड्याची घटना घडली असली तरी, पोलिसांनी केवळ डॉ. बुधिहाळ यांची फिर्याद घेऊन घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयाची मोडतोड तसेच सर्व घटनांमध्ये एक लाख २६ हजार पाचशे रुपयांचा माल गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहेत.