अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी सशस्त्र बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:28 PM2019-09-30T17:28:18+5:302019-09-30T17:31:08+5:30
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, महिला सुरक्षा, लूटमार, पाकीटमारीच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवले आहे. सुमारे २५० पोलीस मंदिराच्या परिसरात पहारा देत आहेत. प्रत्येक भाविकाच्या हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, महिला सुरक्षा, लूटमार, पाकीटमारीच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवले आहे. सुमारे २५० पोलीस मंदिराच्या परिसरात पहारा देत आहेत. प्रत्येक भाविकाच्या हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
नवरात्रौत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. नऊ दिवसांत सुमारे १० लाख भाविक दर्शन घेतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार पोलीस आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धांदल उडाल्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे; परंतु अशा परिस्थितीमध्ये अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले आहे. सकाळी आठ ते रात्री आठ व रात्री आठ ते सकाळी आठ अशा दोन शिफ्टमध्ये २५० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.
महिला पोलिसांचे विशेष पथक
मंदिरात जाण्यासाठी लागलेल्या रांगेत घुसून चोरट्या सराईत महिलांकडून दागिने, पैशाची पाकिटे, मोबाईल अशा वस्तूंची चोरी होण्याची शक्यता गृहीत धरून साध्या वेशातील महिलांचे पोलीस पथक तैनात केले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथकही मंदिरात नियुक्त केले आहे. मंदिरात प्रवेश करणाºया दरवाजांवर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले असून आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. पर्स ठेवण्यासाठी बाहेर व्यवस्था केली आहे.
हॉटेल, लॉजची झडती
नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरात येणारे भाविक लॉज, हॉटेल, यात्री निवास येथे उतरत असतात. या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हॉटेलमध्ये थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून अंबाबाई मंदिराच्या परिसरातील लॉज व यात्री निवासांची दिवसातून एकदा झडती घेतली जात आहे. प्रवेश देताना ओळखपत्रांची पडताळणी करावी, अशा सूचना हॉटेलचालकांना पोलिसांनी दिल्या आहेत.
असा आहे बंदोबस्त
- पोलीस निरीक्षक - २
- उपनिरीक्षक - १०
- पोलीस कर्मचारी - १२५
- होमगार्ड जवान - ५०
- वाहतूक पोलीस - २५
- बॉम्बशोधक पथक - १
- दहशतवादविरोधी पथक- १
- श्वानपथक- १