लष्करप्रमुख रावत बुधवारी कोल्हापूरात, पोलीस, प्रशासनातर्फे रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 07:20 PM2018-10-30T19:20:54+5:302018-10-30T19:24:04+5:30
भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सैन्यदलाच्या टेंबलाई हिल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत माजी सैनिकांचा मेळावा होणार आहे.
कोल्हापूर : भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सैन्यदलाच्या टेंबलाई हिल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत माजी सैनिकांचा मेळावा होणार आहे.
सैन्यदलाच्या कोल्हापुरातील १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआयतर्फे बुधवारी टेंबलाई हिल येथील मिलिटरी स्टेशन येथे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला आहे; त्यासाठी भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे प्रमुख उपस्थित असणार आहेत.
या मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चार हजार माजी सैनिक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी असणाऱ्या निवृत्तिवेतन, वैद्यकीय सुविधा, कर्ज उपलब्धता आदींबाबतची माहिती त्यांना तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहे. मिलिटरी स्टेशन येथे मंगळवारी मंडप उभारणी, साफसफाई, मेळाव्याचे नियोजन, आदी स्वरूपातील तयारी सुरू होती.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस, प्रशासन, अग्निशमन दल, बॉम्बशोध पथक आदींच्या उपस्थितीत एनसीसी भवन या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्याची रंगीत तालीम करण्यात आली. विमानतळावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
हेलिकॉप्टरची चर्चा
दुपारी दोनच्या सुमारास एक हेलिकॉप्टर बराच वेळ शिवाजी विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतन आदी परिसरात आकाशात घिरट्या घालत होते. ते पाहून राजारामपुरी परिसरातील लोकांच्या मनांत भिती निर्माण झाली. त्यांतील कांही लोकांनी पोलिस नियंत्रण कक्ष व ‘लोकमत’कडेही हेलिकॉफ्टर का फिरत असल्याची विचारणा केली. परंतू वस्तूस्थिती समजल्यावर त्यांची शंका दूर झाली.