सोयाबीन पिकावर लष्कर अळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:32+5:302021-04-09T04:25:32+5:30
दानोळी : ढगाळ वातावरण व वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळी सोयाबीन पिकावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकावर हल्ला करत पानांची ...
दानोळी : ढगाळ वातावरण व वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळी सोयाबीन पिकावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकावर हल्ला करत पानांची चाळण करून शेंगांचा फडशा पाडत आहेत. दिवसेंदिवस किडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अनेक शेतकऱ्यांनी उसाची तोडणी लवकर झाल्यामुळे उन्हाळी सोयाबीन पिकाची निवड केली. पीक ही जोमदार आणले आहे; पण सोयाबीन पीक नाजूक असल्याने खोड कीड, मुठऱ्या, बुरशी अशा अनेक रोगांना पीक लवकर बळी पडते. त्यात पाने कुडतरणारी कीड तर हमखास येतेच. म्हणून शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच कीटकनाशकाची वारंवार फवारणी करावी लागते. अगोदरच कडक ऊन त्यात ढगाळ वातावरण होत असल्यामुळे उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे लष्कर अळीची पैदास दिवसेंदिवस वाढत असून किडीने पानांची अक्षरश: चाळण केली आहे. याच्या अळ्या दिवसा जमिनीवर आणि रात्री पिकावर येऊन पानांसह शेंगांचा फडशा पडत आहेत. शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणीवर जोर देत असून किडीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या किडीचा प्रादुर्भाव ऐन शेंगा भरणीच्या वेळेस झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.
सध्या बाजारपेठेत सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. पण हातातोंडाशी आलेले पीक किडीमुळे वाया जाणार का, अशी भीती वाटत आहे.
फोटो - ०८०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कवठेसार (ता. शिरोळ) येथील राजेंद्र माणगावे यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर लष्कर अळीने हल्ला करून अशी पाने कुडतरली आहेत. (छाया-भालचंद्र नांद्रेकर, दानोळी)